अहिल्यानगर : हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील गौरी शुगर डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडकडून नव्या ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी एक जूनपासून करण्यात येणार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (पुणे) यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस लागवडीचे धोरण राहणार आहे. लागवडीचा कालावधी आडसाली १ जून ते ३१ ऑगस्ट, पूर्व हंगामी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर, खोडवा १ डिसेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ साठी असा असेल, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली.
बाबूराव बोत्रे-पाटील म्हणाले, कारखान्याने कार्यक्षेत्रात लागवड हंगाम सन २०२४- २५ मध्ये कोएम ०२६५, को ८६०३२, व्हीएसआय १८१२१, व्हीएसआय ८००५, फुले १५००६, कोएम ०२६५, को व्हीएसआय १८१२१, व्हीएसआय ८००५, फुले १५००६ या बियाण्यांची निवड केली आहे. ज्या शेतकऱ्यांना ऊसाची लागवड रोपांपासून करावयाची आहे, त्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड धोरणाच्या ३० दिवसानंतर ऊस रोपांची लागवड शेतात करावी असे बोत्रे-पाटील यांनी सांगितले. कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मळी (प्रेसमड) योग्य दरात दिली जात आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान अवलंबताना सर्व जातीचा खोडवा, निडवा पिकामध्ये पाचट ठेवावे अगर पाचटाची कुट्टी करावी, त्यामुळे उत्पादनात वाढ होईल. शेतकऱ्यांनी आगामी गळीत हंगामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी केले.