पुणे : हिरडगाव (ता. शिरूर) येथील ओंकार शुगर ग्रुपच्या गौरी शुगर साखर कारखान्याने यंदा दहा लाख टन ऊस गळिताचे उदिष्ट ठेवले आहे. आगामी गळीत हंगामात मांडवगण फराटा व कार्यक्षेत्रातील उसतोडीसंदर्भात जर शेतकऱ्यांना अडचणी आल्या तर त्या सोडविण्यात प्राधान्य दिले जाईल. कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आगामी हंगामातही शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस गाळपास द्यावा, असे आवाहन ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांनी दिले. मांडवगण फराटा येथे कारखान्याच्यावतीने सभासदांना मोफत साखर वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
बोत्रे पाटील म्हणाले की, कारखान्याच्या गळीत हंगामात ऊस गाळपास दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीसाठी मोफत साखर वाटप केली जात आहे. सभासभांना पुरवठा केलेल्या ऊसाच्या टनानुसार १० ते १०० किलो साखर दिली जाणार आहे. ऊस उत्पादकांनाही नगर जिल्ह्यात उच्चांकी बाजारभाव देणार आहे. यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक गोविंदराजे निंबाळकर, बाळासाहेब फराटे, विजयसिंह मोकाशी, भाजपचे एकनाथ शेलार, भाऊसाहेब जाधव, चौरंगनाथ जगताप, लक्ष्मणबापू फराटे, दत्तात्रेय गदादे, दशरथ रणदिवे, दिनेश दरेकर, प्रमोद गरुड आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर जगताप यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.