नवी दिल्ली : जागतिक स्तरावर प्रतिकूल परिस्थिती असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या आर्थिक वर्षात चमकदार कामगिरी केली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जीडीपी वाढीचा दर अंदाजापेक्षा चांगला राहिला. उपलब्ध आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था मार्चच्या तिमाहीत ६.१ टक्के दराने वाढली, तर संपूर्ण आर्थिक वर्ष, २०२२-२३ मध्ये आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवार जीडीपी ग्रोथ रेटचे अधिकृत आकडे जाहीर केले. यानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेने तिमाहीत चांगली कामगिरी केली. यापूर्वी डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ४.५ टक्के होता. मार्चच्या तिमाहीत सर्वच क्षेत्रांनी चांगली कामगिरी केली. कृषी क्षेत्रात ५.५ टक्के दर नोंदवला गेला आहे. तर विनिर्माण क्षेत्रात हा दर ४.५ टक्के होता. आकडेवारीनुसार २०२२-२३ मध्ये भारताचा प्रती व्यक्ती जीडीपी १,९६,९८३ रुपये राहिला. आगामी काळात आर्थिक वाढीचा वेग आणखी वाढील असे अनुमान आहे. एप्रिल-जून २०२३ च्या तिमाहीत वाढीचा दर १३.१ टक्के राहू शकतो. जुलै ते सप्टेंबरदरम्यान वाढीचा दर ६.२ टक्के राहिल असे अनुमान आहे.