अहिल्यानगर : भंडारदरा धरणातून शेतीसाठी सोडलेले पाणी प्रवरा डावा कालव्यात कमी दाबाने सोडले आहे. त्यामुळे पाण्याअभावी श्रीरामपूर भागातील शेतकऱ्यांच्या ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशोक कारखाना बंद पाडण्यासाठी काहींचा हा घाट आहे, असा आरोप माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केला. पाटपाण्याबाबतीत तालुक्यावर अन्याय होत असताना आमदार महाशय एक शब्दही बोलायला तयार नाही, अशी टीका त्यांनी आमदार कानडे यांचे नाव न घेता केली.
माजी आमदार मुरकुटे म्हणाले की, प्रवरा परिसराच्या कार्यक्षेत्रातील उभ्या पिकांना काही ठिकाणी दोनदा पाणी दिले गेले. मात्र, अशोक कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस पिके पाण्याअभावी उध्वस्त झाली. यामागे अशोक कारखाना बंद पाडण्याचा डाव आहे. भंडारदरा धरणाचे उन्हाळी आवर्तनाचा खेळखंडोबा करुन श्रीरामपूर भागातील अनेक शेतकऱ्यांच्या उसाला पाणी न मिळाल्यामुळे उभी पिके उध्वस्त झाली आहेत. पालकमंत्र्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.