पुणे: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची गेली २५ वर्षे एकहाती सत्ता असताना आणि उसाचे मोठे क्षेत्र असतानाही तो तोट्यात का गेला, असा सवाल कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक दादा पाटील-फराटे यांनी केला. कारखाना म्हणजे राजकारणाचा अड्डा नाही. खासगी साखर कारखान्यावर निष्ठा व सहकारी कारखान्यांशी गद्दारी कशासाठी अशी विचारणा त्यांनी केली. घोडगंगा कारखाना सुरू करण्यास प्राधान्य राहील, असे फराटे यांनी सांगितले.
शिरूर येथे पत्रकारांशी बोलताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक दादा पाटील फराटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागितली आहे. उमेदवारी मिळाल्यास निवडणूक ताकदीने लढवू. दरम्यान, कारखान्याच्या कर्ज प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अॅड. अशोक पवार यांनी केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले की, अजित पवार गटात न गेल्याने कारखान्याच्या कर्जाचा निर्णय होत नाही, हा आरोप खोटा आहे. कर्ज प्रस्ताव वेळेत तसेच त्रुटी दुरुस्तीही वेळेत करून सादर करावा लागतो. कर्ज हे व्यवहार व कागदपत्रे पाहून दिले जाते. त्रुटी दूर करायच्या नाहीत व आरोप करायचे हे बरोबर नाही, असेही फराटे यांनी सांगितले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.