पुणे : शिरूरमधील घोडगंगा साखर कारखान्याच्या कामगारांचे थकलेले पगार आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी दीड महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. कामगारांच्या मदतीसाठी शिरूर तालुक्यातील लोक पुढे आले आहेत. कामगारांना लोकसहभागातून जमा केलेल्या अन्यधान्याच्या कीटचे वाटप करण्यात येणार आहे. शिवसेनेचे माऊली कटके आणि मनसेच्या पुढाकारातून तालुक्यातील लोकससहभागातून कामगारांच्या कुटुंबीयांसाठी धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात येणार आहे.
कामगार नेते महादेव मचाले म्हणाले, काम करूनही मोबदला मिळाला नसल्याने आम्हावर आंदोलनाची वेळ आली आहे. शेतकरी आणि कारखान्याचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही दहा महिने पगाराविना काम केले. आमची आर्थिक स्थिती खालावली असून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही गेले दीड महिना आंदोलन करत आहोत. याबाबत कारखान्याचे माजी अध्यक्ष, आमदार अशोक पवारांनी कामगारांच्या कष्टाचा एकही पैसा बुडणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
काय आहेत कामगारांच्या मागण्या ..?
त्रिपक्षीय समितीच्या करारातील ३३ महिन्यांचा १२ टक्के वेतनवाढीचा फरक देणे, सप्टेंबर २०२२ ते जुलै २०२३ या महिन्यांचा थकीत पगार मिळावा, प्रॉव्हिडंड फंड नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ अखेरील थकीत रक्कम द्यावी, कामगार सोसायटीची एक वर्षापासून कपात केलेली थकीत रक्कम मिळावी, २००९-१० पासून रिटेन्शन अलाउंस, कर्मचारी विमा कपातीची रक्कम त्वरीत भरावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार रक्कम द्यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत फायनल पेमेंट करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.