पुणे : न्हावरे (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी सप्टेबर २०२२ ते जून २०२३ असा दहा महिन्याचा थकीत पगार मिळावा, यासह आपल्या दहा विविध मागण्यांसाठी १ जून २०२३ पासून कारखाना कार्यस्थळावर आंदोलन सुरु केले आहे. या संपात सुमारे ६०० कामगार सहभागी झाले आहेत. आंदोलनामुळे कारखान्याच्या सर्वच विभागातील कामकाज ठप्प झाले आहे.
त्रिपक्षीय समितीच्या करारातील ३३ महिन्यांच्या १२ टक्के वेतनवाढीचा फरक मिळावा, सप्टेबर २०२२ ते जून २०२३ असा दहा महिन्याचा थकीत पगार मिळावा, कामगार सोसायटीची कपात केलेली थकीत रक्कम मिळावी, २००९- १० पासूनचा रिटेन्शन अलाउन्स मिळावा, कर्मचारी विमा कपातीची रक्कम भरण्यात यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कामगार नेते तात्यासाहेब शेलार, अनिल शेलार, दत्तात्रय लोंढे, मच्छिंद्र इंगळे आदीसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.