‘घोडगंगा’च्या काम‍गारांनी समन्यायी फॉर्म्युला मान्य करावा : आमदार अशोक पवार

पुणे : घोडगंगा साखर कारखाना कामगारांनी पुकारलेला संप दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. दहा महिन्यांच्या थकीत पगारासह इतर मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यांपासून कामगार संपावर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी अध्यक्ष व आमदार अशोक पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जो तोडगा निघाला तो कामगारांनी मान्य करावा, असे आवाहन केले आहे.

आ. पवार यांनी सांगितले कि, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडगंगा कारखान्याच्या कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून समन्यायी फॉर्म्युला ठरवला आहे. तो संचालक मंडळाने मान्य केला आहे. मात्र, कामगार प्रतिनिधींनी अमान्य केला आहे. तो कामगारांनी मान्य करावा व संप मागे घ्यावा.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मागील आठवड्यात संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधींची पुण्यात बैठक घेतली. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब अनास्कर, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पवार यांनी कामगारांच्या थकीत पगाराच्या दहा टक्के रक्कम व भविष्य निर्वाह निधीची रक्कम लगेच द्यावी व उर्वरित रक्कम कारखान्याकडे फिक्स डिपॉझिट दाखवून त्यावरील व्याज व पुढे थकीत पगार टप्प्याटप्याने द्यावेत, असे सुचविले.

याबाबत संचालक मंडळ व कामगार प्रतिनिधींनी आपापसांत सामंजस्य करार करावा, अशी सूचना त्यांनी केली. ती संचालक मंडळाने मान्य केली. मात्र, कामगार प्रतिनिधींनी इतर कामगारांशी चर्चा करावी लागेल, असे सांगत संप चालूच ठेवला आहे. अशोक पवार म्हणाले, कारखान्यावर एक युनियन असताना दुसऱ्या युनियनचे ते म्हणविणारे आणि कारखान्याशी संबंध नसणारे हा संप चिघळवत असतील तर कायदेशीरदृष्ट्या ते अयोग्य आहे. काहीजण जाणीवपूर्वक तेल टाकून वातावरण पेटते कसे राहील हेच बघत आहेत. सोपानराव गवारे व सोपानराव भाकरे या संचालकांनी कामगार प्रतिनिधींशी संपर्क साधून समन्वयाबाबत विनंती केली. मात्र, अजितदादांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यास कामगार प्रतिनिधींनी नकार दिला. अजितदादांसोबतच्या मिटींगमध्ये प्रथम तुम्ही हो म्हटले आणि आता चर्चा टाळणे, हे योग्य नाही, असेही पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here