सोलापूर : आतापर्यंत शासनाने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील गुऱ्हाळ उत्पादकांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देऊन त्यांनाही देशाच्या इंधन क्षेत्रात योगदान देण्याची संधी द्यावी, अशी मागणी केंद्रीय वाणिज्य व व्यापारमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आली. यावर गूळ उत्पादकांना इथेनॉल निर्मितीची संधी दिली जाईल, असे आश्वासन गोयल यांनी दिले.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस ग्राहकांकडून बदलत्या जीवनशैलीसाठी गुळाची मागणी वाढल्याने गुळ व्यवसायदेखील वृद्धींगत होत आहे. राज्यात फार मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ चालक गुळाची निर्मिती करत आहेत. त्यामुळे गुळ उत्पादकांना इथेनॉल निर्मितीची संधी देण्याची मागणी केली जात आहे. यावर आपण यासाठी सर्वोतपरी साह्य करु. असे आश्वासन मंत्री गोयल यांनी दिले. यावेळी श्री. परदेशी उपस्थित होते.