कोल्हापूर : देशातील व राज्यातील साखर उद्योग स्थिरावला आहे. साखरेसह उपपदार्थाला चांगले दर मिळाले आहेत. मात्र राज्यातील साखर कारखानदार एफआरपी वगळता दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत. राज्य सरकार कारखानदारांच्या पाठीशी असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात संघर्ष केल्याशिवाय काहीच पडणार नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबवित असताना विरोधी पक्ष मूग गिळून गप्प आहे अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. गेल्या हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रतिटन दोनशे रुपये द्यावा, मगच कारखान्याची धुराडी पेटवा असा इशारा शेट्टी यांनी दिला.
शनिवारी कल्पवृक्ष गार्डनमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शेट्टी यांनी स्वाभिमानी’ची २३ वी ऊस परिषद २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर होणार असल्याची घोषणा केली. ऊस परिषदेला महाराष्ट्र, कर्नाटकातून एक लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या जागृतीसाठी गावागावात बैठकांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे सावकर मादनाईक यांनी सांगितले. तर प्रा. जालंदर पाटील म्हणाले, की शेतकरी संघटित करण्याच काम स्वाभिमानीने केले आहे. राज्यातील चळवळीतील सर्व छोटे पक्ष एकत्रित करून परिवर्तन महाशक्ती आघाडी जनतेसमोर सक्षम पर्याय उभा राहिला आहे. या वेळी राजेंद्र गड्यान्नावर, जनार्दन पाटील, विठ्ठल मोरे, अजित पोवार, सचिन शिंदे, राजाराम देसाई, राम पाटील, पोपट मोरे आदींची भाषणे झाली. शैलेश आडके यांनी प्रास्ताविक केले. विक्रम पाटील यांनी सूत्रसंचालन केले.