बेळगाव : ब्राझीलमधील दुष्काळामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उंचावत आहेत. गेल्यावर्षीचा २०२३-२४ हंगाम चांगला गेला आहे. मोलॅसिस, बगॅसच्या दरात वाढ झाली आहे. तर गतवर्षीच्या साखरेची सरासरी ३५५० रुपये क्विंटल दराने विक्री झाली आहे. त्यामुळे कारखानदारांनी मुकाट्याने शेतकऱ्यांना गतवर्षीच्या उसाला टनामागे २०० रुपये द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सोमवारी बेळगाव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
‘स्वाभिमानीची ऊसदराची मागणी कधीच अवास्तव नसते. या मागणीच्या अनुषंगानेच जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी टनामागे १०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. इतर कारखानदारांनीही रक्कम द्यावी असे ते म्हणाले. राजू शेट्टी म्हणाले की, यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. अजूनही महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना हंगामाच्या तोंडावर आंदोलन करीत असल्याच्या आरोपात तथ्य नाही. जयसिंगपूर ऊस परिषदेत गतवर्षीच्या उसाला २०० रुपये देण्याच्या मागणीसह यंदा अपेक्षित पहिली उचल देण्याची घोषणा होणार आहे. यावर्षी साखर निर्यातीला वाव आहे. २५ तारखेला ऊस परिषद असली, तरी तत्पूर्वी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना ऊस दराविषयी चर्चा घडवून आणण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, लोकांना सक्षम पर्याय हवा आहे. म्हणूनच आम्ही परिवर्तन महाशक्तीचा पर्याय दिला असल्याचे शेट्टी म्हणाले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.