उसाचा दुसरा हप्ता त्वरित द्या : राजू शेट्टी यांची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी

कोल्हापूर : सन २०२२-२३ या गळीत हंगामातील उसाला ठरल्यानुसार प्रती टन १०० रुपये व ५० रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली. हा दुसरा हप्ता मिळण्यासाठी गेल्या सात महिन्यांत मुख्यमंत्री यांना पाचवेळा व मुख्य सचिव यांची सहावेळा भेट घेऊन वारंवार मागणी करूनही राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे,असेही शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर २०२२-२३ या हंगामातील ऊस दराचा हप्ता दोन महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरले होते. काही साखर कारखान्यांनी याचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवले. मात्र सत्ताधारी व विरोधी कारखानदारांच्या इशाऱ्यावर राज्य सरकारकडून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लांबवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणीवपूर्वक दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप शेट्टी यांनी केला. यंदा महापुरामुळे ऊसपीक पाण्यात बुडून मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, राजाराम देसाई, अप्पा एडके, धनाजी पाटील, शिवाजी पाटील, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, राम शिंदे, सुधीर मगदूम, अण्णा मगदूम, भीमराव गोनुगुडे, संपत पवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here