पुणे : साखर कारखान्यात तयार होणाऱ्या उपपदार्थांचा फायदा- तोटा, व्याजाचा भुर्दंड, कर्जाचा हप्ता साखर कारखान्यांच्या ताळेबंदात दर्शविला जातो. मग उपपदार्थांतील उत्पन्न शेतकऱ्यांना का नको? असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. उपपदार्थांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळायलाच हवे, अशी मागणी शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांच्याकडे केली. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या साखर (नियंत्रण) आदेश २०२४ मधील काही सुधारणा शेतकऱ्यांसाठी स्वागतार्ह आहेत असेही त्यांनी सांगितले.
शेट्टी यांनी बुधवारी साखर आयुक्तालयात आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांची भेट घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गूळ-खांडसरी उद्योगाच्या प्रतिनिधींनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, धैर्यशील कदम, अभिजित नाईक, जनार्दन पाटील, मारोतराव कवळे, प्रभाकर बांगर यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे-छोटे पक्ष एकत्रित येऊन तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. गुरुवारी (दि. १९) पुण्यात यासाठीची एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचे ते म्हणाले.