“जागतिक जैवइंधन आघाडीने जगभरातील सरकारे, संस्था आणि उद्योगांना आणले एकत्र”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात भारत ऊर्जा सप्ताह 2024 चे उद्घाटन केले. भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 हे भारतातील सर्वात मोठे आणि सर्वसमावेशक ऊर्जा प्रदर्शन आणि परिषद आहे. भारताच्या ऊर्जा संक्रमण उद्दिष्टांना चालना देण्यासाठी संपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीला ही परिषद एका मंचावर आणते. पंतप्रधानांनी, जागतिक तेल आणि वायू मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांसोबत गोलमेज बैठकही घेतली.

पंतप्रधानांनी भारतीय ऊर्जा सप्ताहाच्या दुसऱ्या भागात यावेळी सर्वांचे स्वागत केले. हा कार्यक्रम चैतन्याने सळसळत्या गोव्यासारख्या राज्यात होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गोवा, पाहुणचारासाठी ओळखले जाते आणि येथील नैसर्गिक सौंदर्य तसेच संस्कृती जगभरातील पर्यटकांवर खोलवर अमिट ठसा उमटवते असे ते म्हणाले. “गोवा विकासाच्या नवीन शिखरांना स्पर्श करत आहे”, शाश्वत भविष्यावर चर्चा करण्यासाठी आणि पर्यावरणाप्रती संवेदनशीलतेसाठी हे योग्य ठिकाण आहे असे त्यांनी सांगितले. भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 साठी गोव्यात जमलेले परदेशी पाहुणे राज्याची कायमस्वरूपी स्मृती घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताचा जीडीपी दर आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत 7.5 टक्क्यांच्या पुढे गेला असतानाच्या अतिशय महत्वाच्या काळात भारतीय ऊर्जा सप्ताह 2024 होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशाचा विकास दर जागतिक विकासाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, त्यामुळे भारताची वाटताल सर्वात वेगवान असून ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे ते म्हणाले. भविष्यातही वाढीचा कल असाच राहिल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवल्याचा उल्लेख त्यांनी केला. “भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल” असा जगभरातील आर्थिक तज्ञांचा विश्वास असल्याचे सांगत भारताच्या विकासगाथेत ऊर्जा क्षेत्राच्या विस्तारित व्याप्तीवर पंतप्रधानांनी भर दिला.

भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा ऊर्जा, तेल आणि एलपीजी ग्राहक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. या शिवाय भारत हा चौथा सर्वात मोठा एलएनजी आयातदार आणि तेल शुद्ध करणारा तसेच चौथ्या क्रमांकाची वाहनांची बाजारपेठ आहे. देशात वीजेवर चालणाऱ्या वाहनांची मागणीही प्रचंड वाढत आहे. 2045 पर्यंत देशाची ऊर्जेची मागणी दुप्पट होण्याचा अंदाज आहे. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारताची योजना पंतप्रधानांनी विशद केली. परवडणाऱ्या इंधनाची खातरजमा करण्याच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. जागतिक पटलावर प्रतिकूल घटक असूनही, पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत आणि कोट्यवधी घरांचे विद्युतीकरण करून 100 टक्के वीजेचे उद्दिष्ट प्राप्त केले आहे, अशा काही राष्ट्रांपैकी भारत एक आहे. “भारत केवळ आपल्या गरजा पूर्ण करत नाही तर जागतिक दिशाही ठरवत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

पायाभूत सुविधांच्या अभूतपूर्व वाढीचे स्पष्टीकरण देताना, पंतप्रधानांनी अलीकडील अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याचा उल्लेख करून या रकमेचा मोठा भाग ऊर्जा क्षेत्रासाठी दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही रक्कम उर्जेची गरज भासणाऱ्या रेल्वे, रस्ते, जलमार्ग, हवाई मार्ग किंवा गृहनिर्माण या क्षेत्रांमध्ये विकासासाठी वापरली जाईल, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी सरकारच्या सुधारणांमुळे देशांतर्गत गॅसच्या वाढत्या उत्पादनाची नोंद केली आणि देश प्राथमिक ऊर्जा मिश्रणात गॅसची टक्केवारी 6 वरून 15 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करत आहे असे सांगितले. यामुळे येत्या 5 ते 6 वर्षांत सुमारे 67 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

चक्राकार अर्थव्यवस्था आणि भारताच्या प्राचीन परंपरेचा एक भाग असलेल्या पुनर्वापराच्या संकल्पनेवर प्रकाश टाकत ऊर्जा क्षेत्रासाठीही हेच तत्व लागू होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. जगभरातील सरकारने, संस्था आणि उद्योगांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणारी जागतिक जैवइंधन आघाडी याच तत्वावरील विश्वासाचे प्रतिक आहे असे ते म्हणाले. भारतात झालेल्या जी 20 शिखर परिषदेदरम्यान या आघाडीला मिळालेल्या सर्वसमावेशक समर्थनावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला तसेच जगात जैवइंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी 22 राष्ट्रे आणि 12 आंतरराष्ट्रीय संस्था एकत्रित पुढाकार घेत असल्याची माहिती दिली. यातून 500 अब्ज डॉलरच्या आर्थिक संधी देखील निर्माण झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले.

जैवइंधन क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी भारताच्या जैवइंधनाचा अंगिकार करण्याच्या वाढत्या दराची माहिती दिली. इथेनॉल मिश्रणात 2014 मधील 1.5 टक्क्यांवरून 2023 मध्ये 12 टक्क्यांपर्यंत लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे 42 दशलक्ष मेट्रिक टन घट झाली, असे त्यांनी सांगितले. “2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे सरकारचे लक्ष्य आहे” असे ते म्हणाले. गेल्या वर्षी भारत उर्जा सप्ताहात 80 हून अधिक किरकोळ केंद्रांवर 20 टक्के इथेनॉल मिश्रणाची सुरुवात केल्याची आठवण करून देत आता ही संख्या 9,000 झाली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

‘वेस्ट टू वेल्थ’ व्यवस्थापन प्रारुपाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था बदलण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेची रूपरेषा सांगताना, पंतप्रधानांनी शाश्वत विकासाच्या दिशेने सरकार करत असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. “आम्ही भारतात 5000 कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्रांच्या स्थापनेसाठी काम करत आहोत.” अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. “जगातील एकूण लोकसंख्येच्या 17% लोकसंख्या भारतात असूनही, भारताचा कार्बन उत्सर्जन वाटा फक्त 4% आहे.” अशी टीप्पणी जागतिक पर्यावरणविषयक चिंतांबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. “पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ऊर्जा स्रोतांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून आमचे सरकार ऊर्जा मिश्रणात आणखी सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे.” असेही ते म्हणाले. 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

“नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमतेमध्ये भारत आज जगात चौथ्या क्रमांकावर आहे.” भारताच्या स्थापित क्षमतेपैकी 40 टक्के ऊर्जा बिगर जीवाश्म इंधनातून येते, असे पंतप्रधानांनी सांगितले. “गेल्या दशकात, भारताची सौर ऊर्जा स्थापित क्षमता 20 पटीने वाढली आहे.” असे पंतप्रधानांनी सौरऊर्जेतील देशाच्या प्रगतीवर प्रकाश टाकताना सांगितले. “सौर ऊर्जेच्या वापराला चालना देणाऱ्या मोहिमेने भारतात वेग घेतला आहे”,असे पंतप्रधान म्हणाले.

संपूर्ण भारतातील एक कोटी घरांमध्ये छतावर सौरऊर्जा निर्मिती तबकडी (सोलर रूफटॉप पॅनेल) बसवण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या मोठ्या मोहिमेमुळे, एक कोटी कुटुंबांना ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी तर बनवले जाईलच, सोबत अतिरिक्त वीज, थेट विद्युत निर्मिती संचा पर्यंत (ग्रीड) पोहोचवण्यासाठी यंत्रणाही स्थापन केली जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. या अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे घडून येणाऱ्या बदलांमुळे होणाऱ्या परिणामांचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशद केले. “संपूर्ण सौरऊर्जा मूल्यसाखळीत गुंतवणुकीची मोठी क्षमता आहे”,असेही ते पुढे म्हणाले.हरित (ग्रीन) हायड्रोजन क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा आढावा घेताना पंतप्रधानांनी, भारतासाठी हायड्रोजन उत्पादन आणि निर्यातीचे केंद्र बनण्याचा मार्ग मोकळा करणाऱ्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेवर प्रकाश टाकला. भारताचे हरित ऊर्जा क्षेत्र, गुंतवणूकदार आणि उद्योग दोघांनाही निश्चितच यश मिळवून देऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंडिया एनर्जी वीक, या भारत ऊर्जा सप्ताह उपक्रमातून, ऊर्जा क्षेत्रातील जागतिक सहकार्यासाठी भारताची वचनबद्धता दिसून येते असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “इंडिया एनर्जी वीक इव्हेंट हा केवळ भारताचा कार्यक्रम नसून ‘जगासोबत भारत आणि जगासाठी भारत’ या भावनेचे प्रतिबिंब आहे.”

“आपण एकमेकांकडून शिकू या, अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत सहयोग करूया आणि शाश्वत ऊर्जा विकासासाठी मार्ग शोधूया “, असे सांगत त्यांनी, शाश्वत ऊर्जा विकासासाठी, सहयोग आणि माहितीचे आदानप्रदान यांना चालना देण्यावर भर दिला.

शेवटी, पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देणारे समृद्ध भविष्य घडवण्याबाबत आशावाद व्यक्त केला. ते म्हणाले, “एकत्रितपणे, आपण समृद्ध आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत भविष्य घडवू शकतो.”

गोव्याचे राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय पेट्रोलियम, तेल आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री श्री रामेश्वर तेली, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here