वाॅशिंगटन : २०२३-२०३० या कालावधीत जागतिक इथेनॉल मार्केट वार्षिक ४.२० टक्के चक्रवाढ दराने विकसित होईल, अशी माहिती USD ॲनालिटिक्सने प्रकाशित केलेल्या नव्या संशोधन अहवालातून पुढे आली आहे. अमेरिकेसह इंग्लड, जर्मनी, चीन आणि जपान या देशांचा यात अभ्यास करण्यात आला आहे. इथेनॉल अनेक पद्धतीने तयार केले जाऊ शकते. बायो इथेनॉलच्या पर्यावरणास अनुकूल प्रकारांमध्ये हायड्रॉलिसिस आणि साखरेच्या किण्वन प्रक्रियेचा प्रामुख्याने समावेश होतो.
बायोइथेनॉल पूर्णपणे जैविक स्रोतांपासून बनल्यामुळे कार्बन डायऑक्साइड, वाफ आणि उष्णतेचे स्वच्छ उत्सर्जन करते. या नाविन्यपूर्ण निर्मिती आणि ऊर्जा ज्वलन चक्राचा परिणाम म्हणून बायोइथेनॉलमध्ये कार्बन-न्यूट्रल इंधन बनण्याची क्षमता आहे, असे संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. USD ॲनालिटिक्सच्या अहवालात म्हटले आहे की, इंधन म्हणून इथेनॉलचा वाढता वापर आगामी वर्षांमध्ये इथेनॉल बाजाराच्या वाढीस चालना देईल. पेट्रोल आणि इतर महाग इंधनामध्ये इथेनॉलचे मिश्रण केल्याने वाढत्या ऑटोमोबाईल क्षेत्रातील वायू प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण होते. त्यामुळे जैवइंधन म्हणून इथेनॉलची मागणी वाढत आहे.
जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी मोठ्या कंपन्या इथेनॉल उत्पादन वाढीवर भर देत आहेत. आगामी काही वर्षात उत्तर अमेरिकेत सर्वाधिक गतीने इथेनॉल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. इथेनॉलचा पर्यायी उर्जा स्त्रोत म्हणून मोठ्या प्रमाणावर येथे वापर केला जातो. जैवइंधन म्हणून इथेनॉलचे उत्पादन आणि वापरासाठी अनुकूल सरकारी नियमांमुळे, तसेच विविध देशांच्या पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबद्दल वाढती जागरूकता यामुळे उत्तर अमेरिका इथेनॉल क्षेत्राचे नेतृत्व करीत आहे, असे अहवालात नमुद केले आहे.