नवी दिल्ली : जुलै महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या फूड एजन्सीचा तांदूळ दर निर्देशांक जुलैमध्ये १२ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. या दरम्यान तांदळाच्या किमती निर्देशांकात २.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तांदूळ निर्यात करणार्या देशांमध्ये किमती वाढल्याने आणि भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातल्याने निर्देशांकात मोठी वाढ झाली आहे असे एजन्सीचे म्हणणे आहे. एजन्सीने सांगितले की, जुलैमध्ये अन्न आणि कृषी संघटनेचा (एफएओ) ऑल राइस प्राइस इंडेक्स १२९.७ पॉईंट राहिला. तर गेल्या महिन्यात हा इंडेक्स १२६.२ वर होता.
मनीकंट्रोलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार तांदूळ निर्यातीत भारताचा हिस्सा ४० टक्के आहे. तांदळाच्या देशांतर्गत किमती कमी करण्यासाठी सरकारने गैर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले आहेत. हवामानातील बदलामुळे तांदळाच्या उत्पादनावर संकटाची शक्यता आहे. त्यामुळे किमती अनेक वर्षांच्या उच्चांकी स्थितीत पोहोचल्या आहेत. भारत, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, पाकिस्तान हे प्रमुख तांदूळ निर्यातदार देश आहेत. तर चीन, फिलिपाइन्स, सेनेगल, नायजेरिया, मलेशिया हे मुख्य आयातदार देश म्हटले जातात.