नवी दिल्ली : चीनी मंडी
विदेशातही कच्च्या तेलांचे भाव घसरले असल्याने भारतात त्याचा परिणाम जाणवला असून, येथे कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल २.५ टक्क्यांनी घसरून ३ हजार ५११ रुपयांवर आले आहेत.
मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये चालू महिन्यासाठीच्या पुरवठ्यात कच्चे तेल २.५३ टक्क्यांनी किंवा ९१ रुपयांनी घसरून आहे. एक हजार ८०१ लॉट्सच्या टर्नओव्हरमध्ये प्रति बॅरल दर ३ हजार ५११ रुपयांवर आला आहे. त्याचप्रमाणे जानेवारीमध्ये डिलिवरी होणाऱ्या कच्च्या तेलातही २.४७ टक्क्यांची किंवा ९० रुपयांची घसरण झाली आहे.
बाजारपेठेतील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील अतिरिक्त तेल पुरवठ्याचा परिणाम जागतिक बाजारातील तेलाच्या दरांवर झाला. बाजारात गेल्या १४ महिन्यांतील तेलाचा दर ५९ डॉलर प्रति बॅरल इतक्या निचांकी पातळीपर्यंत खाली आला. गुंतवणूकदारांना जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि तेलाची मागणी वाढण्याविषयी चिंता वाटू लागली आहे. परिणामी भविष्यातील ट्रेडिंगची मागणीही कमी झाली आहे.
दरम्यान, अमेरिकेत न्यूयॉर्क मर्कंटाइल एक्स्चेंजमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट कच्च्या तेलाचे दर १.३१ टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल ४९.५४ डॉलरवर आले आहेत. तर, ब्रेंट क्रूड ऑईल १.३६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ५८.८० अमेरिकी डॉलरवर आले आहे.