पणजी : संजीवनी सहकारी साखर (एसएसएसके) कारखान्याची सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत इथेनॉल उत्पादन युनिट म्हणून पुनर्विकास करण्याची गोवा सरकारची महत्त्वाकांक्षी योजना बोलीदारांअभावी रखडली आहे. कोणीही बोलीदार पुढे न आल्याने सरकार हा प्रकल्प काही काळ स्थगित ठेवण्याच्या विचारात आहे. सरकारने आपल्या पीपीपी विभागामार्फत दोनदा पात्रता (आरएफक्यू) बिडसाठी निविदा मागवली होती. पहिला आरएफक्यू जानेवारीमध्ये जारी करण्यात आला, तर दुसरा यावर्षी मेमध्ये जारी करण्यात आला होता. मात्र, एकाही निविदाकर्त्याने रस दाखवला नाही.
‘द गोवा’ शी बोलताना कृषी संचालक संदीप फळदेसाई म्हणाले की, सार्वजनिक-खाजगी भागीदारी मोड अंतर्गत एसएसएसकेचा इथेनॉल उत्पादन युनिटमध्ये पुनर्विकास करण्यासाठी दोनदा RFQs आमंत्रित करण्यात आले होते. परंतु कोणीही बोलीदार पुढे आला नाही. आम्ही बोलीदारांना आकर्षित करण्यासाठी सुधारित आरएफक्यूदेखील जारी केले. मात्र उपयोग झाला नाही. आता आरएफक्यू पुन्हा जारी करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
तथापि, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पीपीपी विभागाने प्रकल्प स्थगित ठेवण्याचा विचार केल्याच्या माहितीला सचिवालय स्तरावरील सूत्रांनी दुजोरा दिला आहे. विभागाने आमंत्रित केलेल्या आरएफक्यूला कोणताही प्रतिसाद दिसला नाही, असे सूत्रांनी सांगितले. आता यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध वाढल्यानंतर सरकारने जानेवारी महिन्यात पहिली निविदा काढली होती. धारबांदोडा गावात असलेला हा सरकारी उपक्रम संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने प्रशासक चालवत आहेत. कारखाना २०१९ पासून बंद आहे.
सूत्रांनी सांगितले की, संजीवनी ऊस उत्पादक संघाला प्रस्ताव देऊनही त्यांनी इथेनॉल निर्मितीसाठी कोणत्याही कंत्राटदाराची शिफारस केली नाही. पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला योग्य प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक आहे. कारखान्याचे प्रशासक राजेश देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रकल्पाचा निर्णय पीपीपी विभाग आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. दरम्यान, सरकारने कारखान्याला अनुदान देण्याच्या योजनेला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. कारखान्यात ९९ नियमित कर्मचाऱ्यांसह अंदाजे १७० कर्मचारी आहेत. सूत्रांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांना पुन्हा स्वेच्छानिवृत्ती योजनेची निवड करण्याची विनंती करण्यात आली आहे.