सांगे : संजीवनी साखर कारखाना सुरू होण्याबाबत स्पष्टता नसल्यामुळे आणि कारखान्याकडून चालू वर्षात नुकसान भरपाईचा पाच वर्षांचा कालावधी संपत असल्याने सांगे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य अनिश्चित आहे. संजीवनी साखर कारखाना सतत तोट्यात असल्याचे आणि मशीनरी जुनी असल्याचे कारण देत सरकारने २०१९ मध्ये हा कारखाना बंद केला. मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक तर सुधारित यंत्रसामग्री कारखान्यात आणून तो पुन्हा सुरू केली जाईल किंवा कारखान्यात पर्यायी इथेनॉल प्रकल्प उभारला जाईल, असे आश्वासन सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले होते.
संजीवनी साखर कारखाना बंद होताना सरकारने शेतकऱ्यांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. पहिल्या वर्षी ३,००० रुपये प्रती टन, दुसऱ्या वर्षी २,८०० रुपये प्रती टन आणि उर्वरीत तीन वर्षांसाठी अनुक्रमे २६००रुपये, २४०० रुपये, २२०० रुपये प्रती टन असेल असे सांगण्यात आले. संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची चिन्हे नसल्याने व पाच वर्षांचा भरपाईचा कालावधी यावर्षी संपत आल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पुढील वर्षी काय ही चिंता त्यांना सतावत आहे.
सांगेतील ऊस उत्पादक शेतकरी हर्षद प्रभुदेसाई यांनी संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. प्रभुदेसाई यांनी सुचवले की, जर सरकार संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या स्थितीत नसेल, तर तो चालवण्यास घेण्याचे स्वारस्य दाखविलेल्या खासगी घटकांना भाडेतत्त्वावर द्यावा आणि सरकारने वार्षिक भाडेही द्यावे.
संदजीवनी कारखाना बंद असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात आहे. सरकारने कारखान्याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले आहे. शेतकरी फ्रान्सिस्को मस्कारेन्हास म्हणाले की, कारखान्याच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना थोडा वेळ द्यावा. साखर कारखान्याच्या भवितव्याबाबत सरकारने स्पष्ट करावे, अन्यथा शेतकरी संकटात सापडतील. खाण उद्योगातील ट्रक मालकांप्रमाणेच शेतकऱ्यांना दुर्दशेला सामोरे जावे लागेल.
मळकर्णेचे शेतकरी जोसिन्हो डिकोस्टा म्हणाले की, २०१९ मध्ये सरकारने संजीवनी साखर कारखाना बंद केला, तेव्हापासून अनेक शेतकरी फळबाग उत्पादनाकडे वळले आहेत. डिकोस्टा यांनी सरकारला संजीवनी साखर कारखान्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.