धाराशिव : इथेनॉल निर्मितीसाठी शेतकऱ्यांना गोड ज्वारी हा एक चांगला आर्थिक पर्याय आहे. ऊस टंचाईच्या समस्येवर मात करताना साखर कारखान्यांसमोरही हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे, असे नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले. नॅचरल शुगरच्या २२ व्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन रविवारी संचालक राजपाल आणि अंजली माने यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ठोंबरे बोलत होते.
अध्यक्ष ठोंबरे म्हणाले की, कारखाना प्रती टन दोन हजार रुपये या दराने गोड ज्वारीची ताटे खरेदी करेल. शेतकऱ्यांना कमी कालावधीत हरभऱ्यापेक्षा हमखास जादा उत्पादन मिळवून देणारे हे पिक ठरणार आहे. उत्पादन प्रतिएकर २० ते २२ टन मिळविणे असा उद्देश राहील. नॅचरल शुगरकडून विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भविष्यात साखर कारखान्यांना ऊस टंचाईची समस्या भेडसावणार आहे. त्यावर उपाय योजना म्हणून गोड ज्वारीची लागवड कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाधिक केली जावी यासाठी प्रयत्न केले जातील. गोड ज्वारीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होईल.यावेळी पांडुरंग पाटील यांनी गोड ज्वारीबाबत माहिती दिली. युपीएल, अॅडव्हांटा कंपनीने गोड ज्वारी संदर्भात विकसित केलेल्या विविध जातींचे प्रदर्शन केले. पांडूरंग आवाड यांनी प्रास्ताविक केले. संभाजी रेड्डी यांनी आभार मानले.