व्यवसायाला अच्छे दिन: सेवा क्षेत्राने घेतली गती, मात्र रोजगारवाढ नाही

नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी असलेल्या सकारात्मक भावनेमुळे आणि मागणी वाढत असल्याने सेवा क्षेत्राकडून चांगली कामगिरी होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी कोविड लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर व्यवसायाबाबतही सकारात्मक भावना दिसून येत आहे. याचा परिणाम सेवा क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळेच जानेवारी महिन्यात सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग गेल्या ११ महिन्यांत सर्वाधिक आहे.

दळणवळण, स्टोअरेज, कन्झ्युमर सर्व्हिसमध्ये उसळी
आयएचएस इंडिया सर्व्हिसेसचा बिझिनेस अ‍ॅक्टिव्हिटी निर्देशांक जानेवारीमध्ये वाढून ५२.८वर पोहोचला आहे. डिसेंबर २०२० मध्ये हा निर्देशांक ५२.३ वर होता. यादरम्यान, दळणवळण, स्टोअरेज, ग्राहक सेवा क्षेत्राने सर्वाधिक वाढीची नोंद केली आहे. या क्षेत्रांमध्ये नव्या ऑर्डर्स नोंदल्या गेल्या आहेत. ५० हून अधिक अंक बिझनेस अॅक्टिव्हीटीत वाढीची गती दर्शवितात. वस्तूतः कोरोना लसीकरण सुरू झाल्यानंतर व्यवसायविषयक भावना दृढ झाली आहे. त्यामुळे सेवा क्षेत्रातील विविध उद्योगांत मागणी वाढली आहे.

उत्पादन क्षेत्राने घेतली गती
सेवा क्षेत्राबरोबरच उत्पादन क्षेत्रानेही गती घेतल्याचे दिसत आहे. जानेवारी महिन्यात उत्पादन क्षेत्राचा पीएमआय वाढून ५७.७ वर पोहोचला. डिसेंबर २०२० मध्ये हा निर्देशांक ५६.४ वर होता. देशामध्ये उत्पादन वाढ दर्शविणारा एसबीआयचा कम्पोझिट इंडेक्सनुसार उत्पादन क्षेत्रातील घडामोडींतून वाढ दिसून येत आहे. डिसेंबर २०२० मध्ये ही वाढ ५३.३ इतकी होती. तर जानेवारीत ही वाढ ५३.८ टक्क्यांवर दिसली आहे.

रोजगार, निर्यातीत वेग नसल्याने चिंता
आयएचएसच्या म्हणण्यानुसार सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी किमतीत सवलती आणि शुल्कात कपात केल्यामुळे त्यांच्याकडील ऑर्डर्स वाढल्या आहेत. नव्या ग्राहकांचा शोध घेताना कंपन्यांनी आपल्या प्रॉडक्ट्सचे दर कमी केले आहेत. तर शुल्कातही कपात केली आहे. मात्र, कंपन्यांकडून कर्मचारी भरतीने अद्याप वेग घेतलेला नाही. त्यामुळे रोजगार न वाढल्यास सरकारसमोरील अडचणी वाढणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here