आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर निर्यातीसाठी अनुकूल दर असल्याने भारतीय साखर उद्योगासाठी ही स्थिती खूप फायदेशीर बनली आहे. खाद्य तथा सार्वजनिक वितरण विभागाच्या ताज्या अहवालानुसार, २०२१ मध्ये साखर कारखान्यांनी ६० लाख टन साखर निर्यातीसाठी पाठवली आहे. त्यापैकी १६ टनाहून अधिक म्हणजे २६.६७ टक्के साखर निर्यात इंडोनेशिया आणि ६ लाख टनाहून अधिक भारतीय साखर निर्यात अफगाणिस्तानला झाली आहे.
बाजारपेठेतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित साखरेची निर्यात दक्षिण आशिया, आफ्रिका आणि काही अरब देशांमध्ये यशस्वीपणे करण्यात आली. ब्राजीलमध्ये दुष्काळ आणि थंडीच्या वृत्तामुळे जागतिक बाजारपेठेला साखर उत्पादनातील घसरणीच्या चितेंने ग्रासले आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांनी शिपमेंटच्या पाच महिने आधीच साखर निर्यातीबाबतचे करार केले आहेत. चालू हंगाम २०२०-२१ मध्ये साखर निर्यात ७० लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
साखर कारखाने आर्थिक संकटामुळे ऊसाचे पैसे देण्यात असमर्थ ठरले आहेत. आता साखर निर्यातीत सुधारणा होऊ लागल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ शकतात. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात सध्या तेजीची स्थिती आहे. यासोबतच सर्वांच्या नजरा ब्राझीलच्या पिकांसंबंधीच्या अहवालावर खिळल्या आहेत. आगामी हंगाम २०२१-२२ मध्ये भारत सरकारकडून निर्यातीचे कोणते धोरण तयार केले जाते याकडेही सर्वांचे लक्ष आहे.