नवी दिल्ली : सेवा क्षेत्रासारखे आर्थिक निर्देशांक भारताची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत देत आहेत असे प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. इकॉनॉमिक टाइम्स अॅवॉर्ड फॉर कार्पोरेट एक्सलन्स या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सरकार अमेरिकेतील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. गरजेनुसार पावले उचलली जात आहेत असे त्यांनी सांगितले.
पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्ससारख्या उच्च क्षमतेच्या निर्देशांकात हळूहळू सुधारणा होत आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राशिवाय ई वे बिल, रेल्वे भाडे, जीएसटी कलेक्शन यातही वाढ दिसून आली आहे. ही आकडेवारी देशात मागणी वाढत असल्याचे दर्शविते. सकारात्मकता आणि आर्थिक सुधारणांचे हे साफ संकेत आहेत, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
निर्मला सीतारमण यांनी आरबीआयच्या आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, भारताच्या जीडीपीची वाढ निश्चितच होत आहे. सातत्याने ही वाढ टिकून आहे.
मात्र कोरोना व्हायरसच्या वाढत्या फैलावामुळे चिंता वाढली आहे. सरकार या दिशेने प्रयत्न करीत आहे. आता देशात लसीकरणाचा वेग वाढवला आहे. भारतात पुरेशा प्रमाणात लसीचा साठा आहे. लसीकरणाची गती वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याला यश येईल. देशात दोन प्रकारची कोरोनाची लस उपलब्ध आहे. ती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचाविली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.