मुंबई : केंद्र सरकारच्यावतीने पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यात येतो. त्याचप्रमाणे राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील २,००० रुपयांचा पहिला हप्ता व केंद्र सरकारचे २,००० रुपये असे एकूण ४००० हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. दिवाळीआधी हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने त्यांची दिवाळी गोड होणार आहे.
राज्यात सन्मान निधी देण्यास राज्य मंत्रिमंडळाने झालेल्या बैठकीत मंजुरी दिली आहे, तर पीएम किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार मिळणार आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या वार्षिक ६,००० रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी ६ हजार रुपयांची भर घालणार आहे.
जिल्ह्यातील ३ लाख २९ हजार ९५ शेतकऱ्यांना योजनेचे अनुदान मिळणार आहे. पीएम किसान सन्मान योजनेंत जिल्ह्यातील ३ लाख ४० हजार १२४ शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी ३ लाख २९ हजार ९५ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील ९७ टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. अजूनही ११ हजार २९ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी ई- केवायसी तथा आधार सीडिंग करणे गरजेचे आहे असे कृषी उपसंचालक संजीवनी कणखर यांनी सांगितले.