नवी दिल्ली : महागाईच्या आघाडीवर सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळताना दिसत आहे. देशातील किरकोळ महागाईचा दर १८ महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर, ४.७ टक्क्यांवर आला आहे. किरकोळ महागाई दरात झालेली घसरण ही मुख्यत्वे अन्नधान्याच्या किमतीमध्ये घट झाल्याने आहे. सलग दुसऱ्या महिन्यात कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर आधारित महागाई दर आरबीआयने निश्चित केलेल्या ६ टक्के या उद्दिष्टापेक्षा कमी आहे. मार्च महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.६६ टक्के होता आणि एक वर्षापूर्वी समान कालावधीत हा दर ७.७९ टक्के होता.
आजकतमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई ऑक्टोबर २०२१ नंतर सर्वात कमी आहे. तेव्हा हा आकडा ४.४८ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, फूड बास्केट महागाईचा दर एप्रिलमध्ये ३.८४ टक्के होता. तर मार्च महिन्यात हा दर ४.७९ आणि एक वर्षापूर्वी ८.३१ टक्के राहिला. धान्य, दूध, फळांच्या किमती आणि भाजीपाल्याच्या दरातील घसरणीमुळे किरकोळ महागाईचा दर डिसेंबर २०२२ मध्ये ५.७ टक्क्यांवरून वाढून फेब्रुवारी महिन्यात ६.४ टक्क्यांवर पोहोचला होता. ग्रामीण आणि शहरी महागाईच्या दरातही घट दिसून आली आहे. महागाईच्या दरात झालेल्या घसरणीमुळे रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेट बाबतही नरमाईचे धोरण वापरले जाऊ शकते. गेल्यावेळच्या बैठकीतही आरबीआयने दरात वाढ केलेली नाही.