हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मान्सूनची वाटचाल अतिशय सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळा बसल्यामुळं सध्या राज्यात मान्सूनकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. पुण्यातील हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मान्सूनने दक्षिण पश्चिम कोकणात हजेरी लावली असून, येत्या २-३ दिवसांत मान्सून राज्यातील इतर भागांत पोहोचण्याचा अंदाज आहे.
शेती उत्पन्नात महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे. सध्या महाराष्ट्र कापूस, ऊस, सोयाबीन, कांदा आणि रब्बी हंगामातील डाळींचे दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठे राज्य आहे. पण, राज्याला यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर कर्नाटकसह महाराष्ट्राला यंदा मोठ्या प्रमाणावर दुष्काळाच्या झळा बसल्या. राज्यात मराठवाडा आणि विदर्भ भाग अक्षरशः होरपळून निघत आहे. अनेक गावांमध्ये पिके करपून गेली असून, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. राज्य सरकारकडून टँकरच्या साह्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तर, राज्यात पहिल्यांदाच मराठवाड्यात शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चाऱ्याची आणि पाण्याची व्यवस्था असणाऱ्या छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तहानलेला मराठवाडा आणि विदर्भ मान्सूनच्या सरी केव्हा बरसणार याच्या प्रतीक्षेत आहे.
या संदर्भात भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ अधिकारी के. एस. होसलीकर म्हणाले, मान्सूनचे वारे सध्या महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पोहोचले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत हे वारे महाराष्ट्राचा इतर भाग कव्हर करतील.