शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकार देणार मोफत १५० किलो तांदूळ

रायपूर : कमकुवत मान्सूनमुळे यंदा खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी भाताच्या उत्पादनात उच्चांकी घट दिसून आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पूर्ण पिक उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे छत्तीसगढ राज्यात दु्ष्काळासारखी स्थिती आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. भुपेश बघेल सरकारकडून शेतकऱ्यांना १५० किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किसान तक वेबसाइटने म्हटले आहे की, सरकारच्या या निर्णयानंतर लाभार्थ्यांना रेशन कार्डवर १३५ ते १५० किलोपर्यंत तांदूळ मोफत मिळेल. यापूर्वी ३५ किलो तांदूळ दिला जात होता. बीपीएल कार्डधारकांसाठी हा निर्णय आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कृषी मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, यावर्षी १५ जुलैपर्यंत भाताच्या लागवड क्षेत्रात १७.४ टक्के घट झाली होती. तर उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भाताच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांची घट दिसून आली होती. छत्तीसगढ शिवाय इतर राज्यांतही खरिपाच्या कालावधीत पिकांचे मोठे नुकसान झाले. उत्तर प्रदेशमध्ये ६२ हून अधिक जिल्ह्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. बिहार आणि झारखंडमध्येही अशीच स्थिती आहे. झारखंडमध्ये तर सरकारने भात पिकाऐवजी इतर पिक घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. बिहार व झारखंडमध्ये शेतकऱ्यांना ३,५०० रुपयांची मदत देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here