शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता : काणी रोगप्रतिकारक उसाचे कोव्हीएसआय १८१२१ नवे वाण विकसित

पुणे:राज्यात काणी रोगास प्रतिकारक, कांडी किडीस सहनशील, चांगला खोडवा असणाऱ्या कोव्हीएसआय १८१२१ हे नवे वाण प्रसारित करण्यास मान्यता मिळाली आहे.प्रती हेक्टरी १४९.५७ टन उत्पादन देणारी ही उसाची नवी जात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने(व्हीएसआय)विकसित केली आहे.राज्यात पूर्वहंगाम व सुरू या दोन हंगामासाठी या वाणाची शिफारस करण्यात आली आहे.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नुकतीच झाली.त्यामध्ये कोव्हीएसआय १८१२१ या जातीस महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारित करण्यासाठी मान्यता देण्यात आली.‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी-कडू पाटील यांनी ही माहिती दिली.

कडू पाटील यांनी सांगितले की, कोव्हीएसआय १८१२१ या संशोधनात व्हीएसआयचे निवृत्त ऊस प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रमेश हापसे यांच्यासह वरिष्ठ ऊस प्रजनन शास्त्रज्ञ जे. एम. रेपाळे व अन्य आठ टीमने ही कामगिरी केली. कोव्हीएसआय १८१२१ या जातीचे साखर उत्पादन हेक्टरी २२.०३ टन आहे. त्यास तुल्य असणारी मध्यम उशिरा पक्व होणारी को ८६०३२ या वाणाचे हेक्टरी उत्पादन १८.४३ टन आहे. म्हणजे साखरेचे उत्पादन १९.५३ टक्के जास्त मिळते.या जातीमध्ये व्यापारी शर्कराचे प्रमाण (सीसीएस) १४.९५ टक्के आहे.को ८६०३२ या ऊस जातीच्या तुलनेत ते १४.४९ टक्के आहे. म्हणजे ३.१७ टक्क्यांइतके ते १४ व्या महिन्यात जास्त असल्याचे आढळून आले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेमार्फत कोव्हीएसआय १८१२१ या ऊस जातीचे मूलभूत बियाणे साखर कारखान्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.कोव्हीएसआय १८१२१ या जातीचे ऊस उत्पादन हेक्टरी १४९.५७ टन इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here