हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
गेल्या अनेक महिन्यांपासून साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढवण्याची मागणी साखर उद्योगातून होत होती. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसात दिला असून, एमएसपी प्रति किलो दोन रुपयांनी वाढवण्यात आली आहे. गेल्या वर्षी साखरेचे दर सातत्याने घसरू लागल्यानंतर सरकारने साखरेचा किमान विक्री दर २९ रुपये किलो केला होता. आता हा दर ३१ रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्यांतून ३१०० रुपये क्विंटल दराने साखर देशांतर्गत बाजारात पाठवली जाणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळावी यासाठी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ३१०० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. याबाबतचा आदेश केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्रालयाचे सहसचिव सुरेश वसिष्ठ यांनी काढला आहे. या निर्णयाचे साखर उद्योगातून स्वागत झाले आहे. साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. तर, आता शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
साखर विक्रीसाठी देशात किमान दर घोषित करण्यात आल्याने या दरापेक्षा कमी दरात कोणत्याही साखर कारखान्यांना साखर विक्री करता येत नाही. सध्या साखरेचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे २९ रुपये किलो दराने साखर विक्री करणे कारखान्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीचे बिल देण्यात साखर कारखान्यांपुढे अडचण निर्माण झाली होती. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने साखर विक्रीचा दर वाढवून देण्याची मागणी केली होती. साखर उद्योगातून ३४ ते ३६ रुपये प्रति किलो दर करावा, अशी मागणी होत होती. मात्र, सरकारने सामान्य ग्राहकांच्या खिशाचा विचार करून किमान विक्री दर केवळ दोन रुपयांनी वाढविला आहे
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp