नवी दिल्ली : आर्थिक आघाडीवर एकापाठोपाठ दोन चांगल्या घडामोडी घडल्या आहेत. खाद्य पदार्थांच्या किमती कमी झाल्या असून त्यामुळे किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. दुसरीकडे औद्योगिक उत्पादन वाढले आहे.
जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर खालावून ५.५९ टक्के राहिला. सीपीआयवर आधारित महागाई दर जून महिन्यात ६.२६ टक्के होता. तर एक वर्षापूर्वी जुलै महिन्यात हा दर ६.७३ टक्के होता. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यात खाद्यपदार्थांच्या वस्तूंचा महागाई दर ३.३९ टक्के राहिला. यापूर्वी तो ५.१५ टक्के होता. दरम्यान आरबीआयने उपभोक्ता मूल्य सूचकांक ५.७ टक्के राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.
दुसरीकडे औद्योगिक उत्पादन वाढले आहे. जून २०२१ मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. खाण उत्पादनात २३.१ टक्के आणि वीज उत्पादनात ८.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी आयआयटीमध्ये १६.६ टक्क्यांची घसरण झाली होती. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत आयआयपीमध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.