मुंबई: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मुंबई व महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी राज्यातील एकूण १० हजार १८५ पात्र कर्मचारी, अधिकाऱ्यांपैकी तब्बल ७८.८ टक्के जणांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची चिन्हे आहेत. देशभरातील १ लाख ४ हजार ४७१ पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांपैकी ७३ हजार ५५ म्हणजे ६९.९ टक्के जणांनी अर्ज केले आहेत.
राज्यात गट ‘अ’मध्ये ४४९ अधिकारी या योजनेसाठी पात्र आहेत; त्यापैकी ३१३ जणांनी अर्ज केले आहेत. गट ‘ब’मधील ११७४ अधिकारी यासाठी पात्र आहेत; त्यापैकी ८९२ जणांनी अर्ज केले आहेत. गट ‘क’मधील ७,५४१ अधिकारी पात्र आहेत; त्यापैकी ६,२१९ जणांनी अर्ज केले आहेत. गट ‘ड’मधील १,०२१ कर्मचारी या स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत; त्यापैकी ६०२ जणांनी अर्ज केले आहेत. या योजनेसाठी पात्र १० हजार १८५ कर्मचारी-अधिकाऱ्यांपैकी सोमवारपर्यंत ८ हजार २६ जणांनी अर्ज केले. टेलिफोन फॅक्टरी मुंबईतील २८५ पात्र अधिकाऱ्यांपैकी १७७ (६२.१ टक्के) जणांनी अर्ज केले आहेत.
देशात सर्वांत कमी प्रतिसाद जम्मू-काश्मीरमध्ये मिळाला असून, तेथील अवघ्या ३८.३ टक्के जणांनी यासाठी अर्ज केले आहेत. उत्तरांचल राज्यातील कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद देशात सर्वांत जास्त म्हणजे ७८.९ टक्के आहे. देशभरात गट ‘अ’मधील ५,६६१ अधिकारी पात्र असून त्यापैकी ३,८१४ (६७.४ टक्के) जणांनी अर्ज केले आहेत. गट ‘ब’मधील ११ हजार ९७१ पात्र जणांपैकी ८,३२० (६९.५ टक्के) जणांनी अर्ज केले आहेत. गट ‘क’मधील ७१ हजार ७ पात्र अधिकाºयांपैकी ५१ हजार ६८३ (७२.८ टक्के) जणांनी अर्ज केले आहेत. गट ‘ड’मधील पात्र १५ हजार ३०२ कर्मचाऱ्यांपैकी ८,९२२ (५८.४ टक्के) जणांनी स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आहेत. त्याशिवाय इतर ५३० जणांपैकी ३०५ जणांनी अर्ज केले आहेत. ३० जानेवारी २०२० पासून स्वेच्छानिवृत्ती योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत.
या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ४ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांना त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यापासून स्वेच्छानिवृत्ती योजनेचे लाभ देण्यात येतील. तर ज्या कर्मचाऱ्यांचे वय सध्या ५५ पेक्षा कमी आहे, त्यांना फेब्रुवारी २०२५ पासून स्वेच्छानिवृत्तीचे लाभ देण्यात येणार आहेत. राज्यात बीएसएनएलचे १३ हजार ७६६ कर्मचारी-अधिकारी असून त्यापैकी ५५ वर्षांवरील ७,३१९ आहेत. तर ५५ वर्षांखालील ६,४४७ आहेत. एकूण कर्मचाऱ्यांपैकी ५० वर्षांवरील १०,३७४, तर ५० वर्षांखालील ३,३९२ कर्मचारी आहेत.
बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी गणेश हिंगे, भालचंद्र माने, यशवंत केकरे म्हणाले, अपेक्षेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये अर्ज केले आहेत. वेतनाची अनिश्चितता, कुठेही बदली करण्यात येण्याची भीती व निवृत्तीचे वय ५८ केले तर दोन वर्षांच्या सेवेचा फटका बसेल अशा विविध कारणांमुळे या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मत संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.