मुंबई : उसतोड कामगार, वाहतूक कामगार आणि मुकादम यांचा अपघात मृत्यू झाला वा अपंगत्व आलं तर त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने गुरुवारी ‘गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजना राबवण्यास मंजूरी दिली. राज्याचे रहिवासी असलेल्या सर्व ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम झोपडी, बैलजोडीला सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत राज्यातील ऊसतोड कामगार, वाहतूक कामगार, मुकादम, त्यांचे झोपडी आणि बैलजोडी यांचा अपघात विमा उतरवण्याची योजना राबवण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत ४ ऑक्टोबर रोजी निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारने योजनेला मान्यता दिली आहे.
या योजनेतून आग लागून झोपडी आणि सामग्रीचं नुकसान झालं तर १० हजार रुपये, वैयक्तिक अपघातात मृत्यू झाल्यास ५ लाख रुपये, अपघातात अपंगत्व आल्यास २ लाख ५० हजार रुपये, अपघातात वैद्यकीय खर्च ५० हजार रुपये, लहान बैलजोडी मृत्यू वा अपंगत्वासाठी ७५ हजार रुपये आणि अपघातात मोठ्या बैलजोडीचा मृत्यू झाल्यास १ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहेत. पण ही योजना उस गाळप हंगामाच्या कालावधीसाठीच लागू राहणार आहे. यामध्ये रस्ता रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशके हातळताना अथवा अन्य कारणांमुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, ऊंचावरून पडलेला मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, जनावरांचा हल्ला, चावामुळे जखमी वा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल वा अन्य कोणतेही अपघात असेल तर या योजनेतून लाभ मिळणार आहे.