हैदराबाद : उद्योग मंत्री के. टी. रामाराव यांनी मंगळवारी निजाम साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. तत्कालीन कृषी मंत्री पोचारम श्रीनिवास रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने साखर कारखान्यांच्या कामकाजाचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी विधानसभेत म्हटले होते की, राज्य सरकार निजाम शुगर मिलच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून जशा पद्धतीने सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापन होते, तशाच पद्धतीने या कारखान्याचे व्यवस्थापन झाले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.
मंत्री रामाराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काँग्रेसचे आमदार जीवन रेड्डी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले त्यांना जीवन रेड्डी यांना अध्यक्ष बनवायचे होते आणि कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. बीआरएस सरकारने सिरपूर पेपर मिलचे पुनरुज्जीवन केले होते आणि एपी रेयॉन्स कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू होते. तोटा आणि इतर कारणांनी हा कारखाना चालू होऊ शकला नाही. ते म्हणाले की, याबाबत आयटीसीसोबत चर्चा सुरू आहे.