नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व साखर कारखानदारांना देशांतर्गत बाजारात साखर विक्रीसाठी मासिक कोटा धोरण मर्यादा आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. यासोबतच NSWS च्या पोर्टलवर योग्य डेटा सादर करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. साखर कारखान्यांना पाठवलेल्या पत्रात DFPD ने म्हटले आहे की, काही साखर कारखाने मासिक साठा मर्यादेच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे दिसून आले आहे. ते आपल्या मासिक कोट्यापेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणात (९० टक्केपेक्षा कमी) साखर विक्री करीत आहेत.
मासिक कोटा मर्यादेपासून साखर कारखानदारांकडून होणाऱ्या तफावतीमुळे देशांतर्गत साखर बाजार विस्कळीत होऊ शकतो आणि साखर उद्योगाच्या हितासाठी सरकारने राबविलेल्या सर्वसमावेशक उपाययोजनांना बाधा येऊ शकते. परिणामी शेतकर्यांना ऊस दर देण्यासही विलंब होऊ शकतो. DFPD ने साखर कारखानदारांना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची विक्री करण्यासाठी सर्व कारखान्यांना मासिक कोटा मर्यादेच्या आदेशांचे पालन करावे लागेल, असे पत्रात म्हटले आहे. त्याचे पालन न करणाऱ्या कारखान्यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, प्रत्येक साखर कारखान्याने संबंधित महिन्यात वाटप केलेल्या मासिक कोट्याच्या किमान ९० टक्के साखरेची विक्री करणे अपेक्षित आहे. एखाद्या साखर कारखान्याला मासिक कोट्यातील संपूर्ण रक्कम विकणे कठीण किंवा अक्षम वाटत असल्यास, प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेपूर्वी कारखान्याने विक्रीची शक्यता स्पष्टपणे द्यावी. जर एखाद्या कारखान्याला १०० एमटी मासिक साखर विक्री कोटा असेल आणि ८० एमटी साखर विकली जाईल असे वाटत असेल तर त्याची माहिती संचालनालयाला द्यावी.
जर एखादा कारखाना कोट्याबाबतही माहिती देण्यात अपयशी ठरला तर उर्वरीत साखरेचे प्रमाण कमी करून त्याचा कोटा पुढील महिन्यात कमी केला जाईल. उदाहरणार्थ कारखान्याने १०० मेट्रिक टन कोट्यापैकी ८० मेट्रिक टनाची विक्री केली असेल तर पुढील महिन्यासाठी त्याचा कोटा १२० मेट्रिक टन असेल. मात्र, पुढील महिन्यात त्याच्या कोट्यावर निर्बंध आणून पात्र कोटा ८० टक्के म्हणजे ९६ मेट्रिक टन केला जाईल.
सरकारला NSWS पोर्टलवर अनेक कारखान्यांनी जून २०२३ मधील विक्री डेटा आणि जून २०२३ च्या जीएसटीआर १ अनुसार विक्री डेटामध्ये तफावत दिसली आहे. त्यामुळे सरकारने NSWS पोर्टलवर साखर विक्री, /डिस्पॅचचा योग्य डेटा देण्याचा आग्रह केला आहे.
नॅशनल फेडरेश्न ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे यांनीही कारखान्यांनी अचूक डेटा देण्याचे आवाहन केले. चीनीमंडी सोबत बोलताना ते म्हणाले, “देशभरातील कारखान्यांना समान साखर विक्रीची संधी मिळावी असे सरकारचे प्रयत्न आहेत. यासोबतच देशांतर्गत किमती टिकविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कारखानदारांना साखर विक्रीची समान संधी मिळण्यासाठी मदत करावी. त्यांनी स्वत:च्या हितासाठी NSWS पोर्टलवर विक्री/डिस्पॅचेसचा अचूक डेटा कळवावा.” साखर तसेच इथेनॉलबाबत NSWS पोर्टलवर चुकीची माहिती दिल्यास कारवाईचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.
साखर कारखान्यांना पाठविण्यात आलेले पत्र वाचण्यासाठी येथे क्लिक करा.