मंगळुरू : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, मंत्रालयाने ऑटोमोबाईल निर्मात्यांसाठी फ्लेक्सी इंजिनच्या वाहनांचे उत्पादन करण्यासाठी अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्या अंतर्गत वाहनात पेट्रोल आणि इथेनॉल अशा दोन्ही इंधनांचा वापर करता येईल. मंत्री गडकरी म्हणाले की, ऊर्जा आणि वीज क्षेत्रातील प्रगतीसाठी कृषी क्षेत्रात विविधता आणण्याची गरज आहे. भारताला इथेनॉल अर्थव्यवस्था बनविण्याची आवश्यकता आहे. सुझुकी, ह्युंदाई, टोयाटो, किर्लोस्कर सह काही वाहन निर्मात्यांनी आधीपासूनच मंत्रालयाच्या सल्ल्यानुसार कामकाज सुरू केले आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत फ्लेक्सीं इंजिनाची वाहने रस्त्यावर येऊ शकतात. सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के मिश्रण करण्यासाठी ४०० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले जात आहे. तर फ्लेक्सी इंजिनाची वाहने कारखान्यातून येऊ लागली तर देशाला दरवर्षी २००० कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल.
मंगळुरुमधील कनारा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या (केसीसीआय) सदस्यांशी बोलताना गडकरी म्हणाले की, देशातील कृषी उत्पादनांमध्ये खूप मोठी शक्यता दडली आहे. एकेकाळी कमी अन्नधान्य उत्पादनाचा समना करणाऱ्या देशाकडे अतिरिक्त धान्य आहे. गडकरी म्हणाले की, सरकारने इथेनॉल धोरणास मंजुरी दिली आहे. या क्षेत्राची दारे खासगी गुंतवणूकदारांसाठी उघडण्यात आली आहेत. आमच्याकडे तांदूळ, मक्का आणि ऊस अतिरिक्त आहे. जर अतिरिक्त कृषी उत्पादनांचा वापर इथेनॉलसाठी केला गेला तर आयातीवरील खर्चापासून देशाची चांगली बचत होईल. तसेच शेतकऱ्यांना चांगले रिटर्न मिळतील.