नवी दिल्ली : ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री निमुबेन जयंतीभाई बांभानिया यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात साखरेच्या किमान विक्री किंमतीबद्दल (MSP) माहिती दिली. खासदार मोहम्मद नदीमुल हक यांनी विचारलेल्या साखरेच्या एमएसपीमध्ये सुधारणेच्या सरकारच्या निर्णयासाठी अपेक्षित कालावधी आणि त्यासाठीच्या सल्लामसलतीच्या कालावधीत भागधारकांचा समावेश आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, साखरेच्या एमएसपीमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही. या संदर्भात साखर उद्योग संघटना आणि भागधारकांकडून विविध निवेदने/सूचना प्राप्त झाल्या आहेत.
सरकारने इतर संबंधित मंत्रालये/विभागांशी सल्लामसलत केली आहे आणि त्यावर टिप्पण्या मागवल्या आहेत. त्यांनी असेही सांगितले की, चालू साखर हंगाम, २०२४-२५ साठी २७ जानेवारी २०२५ पर्यंत साखरेचे उत्पादन १४६.०५ लाख मेट्रिक टन झाले आहे. साखरेची सध्याची किमान आधारभूत किंमत फेब्रुवारी २०१९ मध्ये ३१ रुपये प्रति किलो निश्चित करण्यात आली होती, ती अजूनही कायम आहे. तथापि, वाढत्या उत्पादन खर्चामुळे उद्योग समुहांनी दरवाढीची मागणी केली आहे. तफावत दूर करण्यासाठी, भारतातील उद्योग संघटना सरकारला साखरेचा किमान आधारभूत किमती सध्याच्या ३१ रुपयांवरून ३९.१४ रुपये प्रती किलोपर्यंत वाढवण्याचा आग्रह करत आहेत.