मंगळुरू : केंद्र सरकार देशात इथेनॉल उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मंगळुरू येथे कनारा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजद्वारे (KCCI) Confederation of Indian Industry (CII), Kanara Industries Association (KII) आणि CREDAI यांच्या सहयोगाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. इथेनॉलचा पुरवठा वाढविण्याबरोबरच फ्लेक्स फ्यूएल इंजिन असलेल्या वाहनांची उपलब्धता करणे ही सरकारची योजना आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
याबाबत डेक्कन हेराल्डमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, पुढील दोन वर्षात देशात बायो इथेनॉलचे उत्पादन करणारे ३०० हून अधिक उद्योग खुले होतील. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत बायोइथेनॉल पर्यावरण पूरक आहे. त्याची निर्मिती तांदूळ, मक्का, बायोमास आणि इतर कृषी उत्पादनांपासून केले जाऊ शकते. भारताच्या अर्थव्यवस्थेला इथेनॉलकडे वळविण्याची हीच योग्य वेळ आहे. ग्रीन हायड्रोजनवर भर देताना मंत्री गडकरी म्हणाले, युरोपीय देशांत ग्रीन हायड्रोजनचा वापर केला जातो.
ते म्हणाले, देशात ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनाच्या पुरेशा संधी उपलब्ध आहेत. अशा वाहनांची व्यवहार्यता तपासण्यासाठी एक पायलट प्रोजेक्टच्या रुपात लवकरच हायड्रोजनवर चालणारी एक कार लाँच केली जाईल. कारसाठी ग्रीन हायड्रोजनचा पुरवठा इंडियन ऑइलच्या पंपामधून होईल. ग्रीन हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन असेल. देशातील लॉजिस्टिकचा खर्च कमी करण्यासाठी २२ ग्रीन एक्स्प्रेस हायवे तयार केले जात आहेत. चेन्नई-बेंगळुरू एक्स्प्रेस हायवेचे काम सुरू आहे. एकदा याचे काम पूर्ण झाल्यानंतर चेन्नई ते बेंगळुरू हा प्रवास दोन तासांचाच असेल.