भारत सरकारने जागतिक ऊर्जा आव्हान अतिशय उत्तम प्रकारे हाताळले आहे: केंद्रीय मंत्री हरदीप एस. पुरी

जागतिक स्तरावरील कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या वाढत्या किमतींची आपल्या विकसनशील अर्थव्यवस्थेला झळ बसणार नाही याची काळजी घेत भारत सरकारने जागतिक ऊर्जा आव्हाने अतिशय उत्तम प्रकारे हाताळली.  सध्याच्या घडीला , आपल्या देशात दररोज पाच दशलक्ष बॅरल पेट्रोलियम वापरले  जात असून  त्यातही तीन टक्क्यांनी वाढ होत आहे, जी जागतिक सरासरीच्या सुमारे  एक टक्क्यांपेक्षा जास्त आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप एस पुरी यांनी शुक्रवारी जयपूरच्या सीतापुरा येथील जेईसीसी इथे सुरू झालेल्या तीन दिवसीय दक्षिण आशियाई भूविज्ञान परिषद -जिओ इंडिया 2022 मध्ये माध्यमांना ही माहिती दिली.

ओएनजीसीचे माजी संचालक (अन्वेषण) आणि ज्येष्ठ भूवैज्ञानिक श्याम व्यास राव यांना  उद्घाटन सत्रात पेट्रोलियम मंत्र्यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची टक्केवारी 9 वर्षांत 10 टक्क्यांपर्यंत वाढली. उद्घाटन सत्रात, हरदीप पुरी म्हणाले की पेट्रोलमधील इथेनॉल-मिश्रण टक्केवारी 2013 मध्ये 0.67 टक्के होती ती मे 2022 मध्ये म्हणजेच  निर्धारित वेळेच्या 5 महिने आधी 10 टक्क्यांपर्यंत वाढली आहे, .

यामुळे 2.7 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन कमी होत आहे जे पर्यावरणासाठी चांगले आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या अंदाजानुसार, आगामी दोन दशकात जागतिक ऊर्जा वापरामध्ये भारताचा वाटा एक चतुर्थांश (25%) असेल. बीपीचा अंदाज आहे की 2050 पर्यंत भारताची ऊर्जेची मागणी दुप्पट होईल, तर  नैसर्गिक वायूची मागणी पाच पटीने वाढण्याची शक्यता  आहे. पेट्रोलियम मंत्र्यांनी जिओइंडिया 2022 च्या प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. यामध्ये अनेक भारतीय आणि जागतिक पेट्रोलियम कंपन्या आणि सेवा प्रदाते तेल आणि वायूचे शोधकार्य  आणि उत्पादनासाठी त्यांच्या अत्याधुनिक सेवा आणि साधने सादर करत आहेत.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here