खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याला गतवर्षीच्या, तसेच चालू वर्षातील गळीत हंगामातील देणी भागविण्यासाठी सात कोटी रुपयांच्या अल्प मुदतीच्या कर्जास शासन हमी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अर्थ विभागाने शुक्रवारी घेतला आहे. त्यामुळे या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल.
फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्यास गळीत हंगाम २०१७-१८ ची देणी भागविण्यासाठी, तसेच गळीत हंगाम २०१८-१९ चा हंगामपूर्व खर्च भागविण्यासाठी पुण्याच्या साखर आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अल्पमुदतीचे कर्ज घेण्यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासनहमी देण्यास मान्यता दिली आहे. या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या २८ मे रोजीच्या बैठकीतही मान्यता मिळाली आहे.
आता या प्रस्तावाला काही अटी व शर्तींच्या आधारे मधुकर सहकारी साखर कारखान्यास सात कोटी रुपयांच्या सहा महिन्यांच्या अल्प मुदतीच्या कर्जासाठी शासनहमी देण्यास अर्थ विभागाने मान्यता दिली आहे. स्थानिक राजकारणामुळे त्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सहकार क्षेत्रात बोलले जात आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.