मुजफ्फरपूर : मोतीपूर साखर कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यास आमचे प्राधान्य राहील. यासाठी उद्योगपतींसह मल्टिनॅशनल कंपन्यांना आमंत्रित करणार आहे असे ऊस उद्योग आणि कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी जाहीर केले.
मोतीपूर साखर कारखान्यात पहिल्यांदा साखरेचे उत्पादन होईल आणि नंतर तेथे अन्य उद्योग सुरू होतील असे मंत्री प्रमोद कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले, यासोबतच २०२२ पर्यंत इथेनॉल उत्पादन २० टक्क्यांपर्यंत करण्यासाठी प्रयत्न केले जातील. इथेनॉल उत्पादनामुळे क्रुड ऑइलच्या ४० टक्के खरेदीत बचत होणार आहे. देशाचा विकास हे आमचे लक्ष्य आहे. इथेनॉल उत्पादन वाढवणे ही केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याला बिहारमध्ये पाठबळ दिले जाईल. याच पद्धतीने खांडसरी उद्योगाला प्रोत्साहन दिले जाईल. त्यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक सुधारणांना गती मिळेल.
मंत्री प्रमोद कुमा यांनी कायदा सुव्यवस्थेसाठी सुविधांची पूर्तता केली जात असल्याचे सांगितले. पोलीस, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख आणि न्यायाधीश अशा महत्त्वाच्या पदांमध्ये समन्वय साधून खटले लवकर मार्गी लावण्यासाठी गतीमान सुनावणीसाठी योजना आखली जात आहे. मुजफ्फरपूर येथील जिल्हा न्यायाधीशांचे पद दीर्घ काळापासून रिक्त आहे. लवकरच या पदावर नियुक्ती व्हावी यासाठी उच्च न्यायालयाशी चर्चा केली जाईल.
ऊस उद्योग आणि कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी मुजफ्फरपूरचा दौरा केला. सर्वात आधी ते गरीबनाथ मंदिरात पोहोचले. तेथे त्यांनी पूजा-अर्चा केली. त्यानंतर मक्खनशाह चौकातील कार्यक्रमाला उपस्थित राहून ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकारी प्रणव कुमार यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी विभागांचा आढावा घेतला. माजी आमदार केदार गुप्ता, जिल्हा सरचिटणीस धर्मेंद्र साहू, जिल्हा प्रवक्ते प्रभात कुमार, देवाशू किशोर, पवन दूबे, योगेश कुमार टिंकू, साकेत शुभम, नगरसेवक के. पी. पप्पू, डॉ. विनायक, संतोषसाहेब, टिंकू शुल्का आदींनी त्यांचे स्वागत केले.