कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर २५ वर्षे चालवण्यास देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. राधानगरी तालुक्यातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी आण्णासाहेब नवणे यांनी साखर कारखान्याचे स्वप्न पाहिले. ते २८ वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होत असून, या निर्णयामुळे गेल्या २८ वर्षांचा सह्याद्री साखर कारखान्याचा वनवास संपला आहे.
सह्याद्री कारखान्याचे अण्णासाहेब नवणे यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी बाळासाहेब तथा सदाशिवराव नवणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. गेली अठ्ठावीस वर्षे यासाठीचा संघर्ष सुरू होता. त्यांचे चिरंजीव आशिनकुमार नवणे यांनीही त्यांच्यासोबत राहून यासाठी अथक प्रयत्न केले. त्यास आता मूर्त रुप आले आहे. कारखाना बीओटी तत्वावर सुरू करण्याच्या या निर्णयाने राधानगरी तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.