साखर कारखानदारीला सरकारची चुकीची धोरणे मारक : आमदार पी. एन. पाटील

कोल्हापूर : साखर कारखानदारी बाबत सरकारची धोरणे चुकीची ठरत असल्यामुळे सर्वच साखर कारखाने अडचणीत आले आहेत, असे प्रतिपादन आमदार पी. एन. पाटील यांनी केले. राशिवडे (ता. राधानगरी) येथे राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच संजीवनी पाटील होत्या. मी चेअरमन म्हणून साखर कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी मी चेअरमन असताना निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही; मात्र, चेअरमनपदाची चटक लागलेले आमच्या विरोधात बोलत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

सभेत गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, आमदार पाटील हे भोगावतीचे चेअरमन व केडीसीसी बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे, भोगावती साखर कारखान्याची ऊस बिले सभासदांना वेळेत मिळाली आहेत. मेळाव्यात क्रांतिसिंह पवार-पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, संचालक किसन चौगले, जनता दलाचे वसंतराव पाटील, किरण पाटील, श्रीपती पाटील यांनी राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. भोगावतीचे माजी संचालक अविनाश पाटील यांनी स्वागत केले. भोगावतीचे संचालक कृष्णराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पोवार यांनी आभार मानले. सभेस गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जि. प. सदस्य विनय पाटील, बबनराव रानगे, अशोक पाटील, उपसरपंच अजिंक्य गोनुगडे आदींसह सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here