केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने २८ ऑक्टोबर २०२२ रोजी जारी केलेल्या एका अधिसूचनेनुसार, नोव्हेंबर महिन्यासाठी देशातील ४०८ कारखान्यांना साखर विक्रीसाठी २२ लाख टनाचा कोटा मंजूर केला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखर मंजूर करण्यात आली आहे. अन्न मंत्रालयाने ऑक्टोबर २०२२ साठी २३.५० लाख टन साखर विक्री कोट्यास मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे नोव्हेंबर २०२१ च्या तुलनेही यावेळी कमी साखर मंजूर केली आहे. सरकारने नोव्हेंबर २०२१ साठी २२.५० लाख टन साखर कोटी मंजूर केला होता.
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या एका ट्वीटनुसार, “देशांतर्गत खपासाठी साखरेची पुरेशी उपलब्धता निश्चित करण्यासाठी नोव्हेंबर २०२२ या महिन्यासाठी साखर कारखानानिहाय मासिक कोटा २२ लाख मेट्रिक टन असेल अशी घोषणा करण्यात आली आहे.
जाणकारांच्या म्हणण्यानुसार, या काळात बाजार स्थिर राहील. आणि नवा गळीत हंगाम सुरू झाल्याने फ्लो वाढणार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत गळीत लवकर सुरू होईल. उत्तर प्रदेशमध्ये हंगामासाठी होणारा थोडा उशीर लक्षात घेवून, महिन्याच्या पहिल्या सहामाहीत साखरेच्या दराला पाठिंबा मिळू शकतो. तर दुसऱ्या सहामाहीत दर मर्यादीत राहतील अशी शक्यता आहे. कारण देशांतर्गत बाजारात नव्या साखरेचा पुरवठा सुरू होऊ शकतो.
केंद्र सरकारने साखरेचा जादा पुरवठा नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि दर निश्चितीमधील स्थिरतेसाठी मासिक कोटी रिलिज पद्धती स्वीकारली आहे.