नवी दिल्ली : व्यापार संघटना आणि बँकांनी अधिकाधिक देशांसोबत रुपयामध्ये व्यापार वाढवावा, असे निर्देश सरकारने दिले आहे. रशिया, मॉरिशस आणि श्रीलंकेसोबत रुपयात व्यापार सुलभ बनविल्यानंतर आता नव्या देशांमध्ये हीच पद्धत अवलंबिण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केले आहेत. भारतीय बँकांनी आधीच या तीन देशांमध्ये वोस्ट्रो रुपया खाते (एसव्हीआरए) उघडले आहे. या खात्यांमध्ये रुपयात व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. अलिकडेच एसबीआय मॉरिशस लिमिटेड आणि पिपल्स बँक ऑफ श्रीलंकाने भारतीय स्टेट बँकेसोबत (एसबीआय) एसव्हीआरए खाते उघडले आहे.
जागरमणध्ये प्रकाशित वृत्तानुसार, याशिवाय बँक ऑफ सिलोनने आपल्या भारतीय सब्सिडरी कंपनीत एक खाते उघडले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने रशियाच्या रास बँकेत खास रुपया खाते उघडले आहे. चेन्नईस्थित इंडियन बँकेने कोलंबोस्थित एनडीबी बँक आणि सिलोन बँकेसह श्रीलंकेच्या तीन बँकांमध्ये खाती उघडली आहेत. आरबीआयच्या मंजुरीनंतर रशियामध्ये दोन तर श्रीलंकेत एका बँकेसह ११ बँकांनी अशा एकूण १८ खाती उघडली आहेत. आरबीआयने जुलै महिन्यात देशाच्या चलनात सीमेलपलिकडे व्यापारी देवाण-घेवाणीबाबत निर्देश दिले होते. अर्थ मंत्रालयाने याबाबत अलिकडेच झालेल्या एका आढावा बैठकीत द्विपक्षीय व्यापाराच्या विस्तारावर जोर दिला होता.