बेंगळुरू : राज्य सरकारकडे जवळपास १५,००० कोटी रुपये गुंतवणुकीसह साखर कारखाना स्थापन करण्याचे ४४ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती साखर खात्याचे मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी दिली.
याबाबत डेक्कन हेराल्डमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, केंद्रीय वाणिज्य आणि अन्न मंत्री पीयुष गोयल यांची भेट घेण्यासाठी येथे आलेल्या मंत्री मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, बहुसंख्य कारखाने बेळगाव, विजयपुरा, बागलकोट, कोप्पल आणि धारवाड जिल्ह्यात स्थापन होतील. सर्व कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकबाकी अदा केली आहे, असा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांनी उसाचा योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) वाढविण्यासाठी मागणी केली आहे. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्य सरकारने केंद्रीय वाणिज्य आणि अन्न मंत्री पियुष गोयल यांना आधीच एक निवेदन सुपूर्द केले आहे.
ते म्हणाले की, अलिकडेच त्यांनी साखर कारखानदारांशी चर्चा केली आहे. आणि त्यांच्याशी उसाच्या उप उत्पादन इथेनॉलपासून होणाऱ्या लाभातील हिस्सा शेतकऱ्यांमध्ये वाटप करण्याबाबत सांगितले आहे. कारखानदारांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले की, राज्यातील ७२ पैकी ३४ कारखान्यांकडे उप उत्पादनाबाबत लायसन्स आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) डिसेबंर २०२२पासून पुरवठा केल्या जाणाऱ्या उसाच्या रसापासून उत्पादित इथेनॉलच्या किमतीत वाढ केली आहे.