20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी धान्य आधारित डिस्टिलरीज किमान 5 पट वाढवाव्या लागतील : अविनाश वर्मा

नवी दिल्ली : केंद्र सरकार ने 2025 पर्यंत 20% एथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य निश्चित केले आहे. इथेनॉल मिश्रणाचे हे ध्येय गाठण्यासाठी सरकार इथेनॉल उत्पादनाला मोठ्या प्रमाणात चालना देत आहे.  केंद्र सरकारने जैवइंधन उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र, अलीकडेच भारतीय अन्न महामंडळाकडून (FCI) अनुदानित तांदूळ पुरवठा बंद केल्यामुळे डिस्टिलरींना कच्च्या मालाअभावी त्यांचे कामकाज बंद करावे लागले. त्यानंर तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) तांदूळ आणि मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलच्या किमती पुन्हा वाढवल्या, ज्यामुळे डिस्टिलरीजचे उत्पादन पुन्हा सुरू झाले. सरकारने ठरवून दिलेले इथेनॉल उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यात नेमके कोणते अडथळे आहेत, हे या क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ अविनाश वर्मा यांच्याकडून जाणून घेऊ…

‘चीनीमंडी’ ला दिलेल्या खास मुलाखतीत ISMA चे माजी महासंचालक, भारत सरकारमधील माजी नोकरशहा आणि सध्याचे ईस्टर्न इंडिया बायोफ्यूल्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक अविनाश वर्मा यांनी सध्याच्या इथेनॉल उद्योगाच्या परिस्थितीबद्दल आणि त्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल त्यांचे विचार सविस्तरपणे मांडले आहेत. चला तर मग जाणून घेऊ वर्मा काय म्हणतात ते…

भारताचा इथेनॉल मिश्रण कार्यक्रम आणि 2025 पर्यंत 20% मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी धान्य आधारित डिस्टिलरीजचे योगदान किती महत्त्वाचे आहे, असे तुम्हाला वाटते?

भारत सरकारचा थिंक टँक NITI आयोगाने फीडस्टॉकपासून मिश्रणापर्यंत इथेनॉल उत्पादनाच्या मूल्य शृंखलेत जबाबदार आणि संबंधित सर्व मंत्रालयांशी सल्लामसलत केल्यानंतर स्पष्ट केले की, 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण साध्य करण्यासाठी आपल्याला तब्बल 10.20 अब्ज लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल. यासाठी आपली अल्कोहोल उत्पादन क्षमता (केमिकल आणि अल्कोहोल क्षेत्राची मागणी पूर्ण करण्यासाठी) सुमारे 15 अब्ज लिटर गरजेची आहे. इथेनॉल उत्पादनासाठी अतिरिक्त ऊस वळवण्याची मर्यादा लक्षात घेऊन NITI आयोगाने ऊस आधारित डिस्टिलरींची 7.6 अब्ज लिटर आणि उर्वरित 7.4 अब्ज लिटर धान्यावर आधारित डिस्टिलरीजची उत्पादन क्षमता आवश्यक असल्याचे म्हटले आहे. सध्या उसापासून इथेनॉल निर्मितीची क्षमता सुमारे 5 अब्ज लिटर आणि धान्यावर आधारित डिस्टिलरीजची क्षमता सुमारे 1.2 अब्ज लिटर इतकी आहे. जर आपल्याला पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट गाठायचे असेल, तर धान्यावर आधारित डिस्टिलरीज किमान 5 पट वाढवाव्या लागतील अन्यथा, भारताला 2025 पर्यंत आपल्या 20 टक्के मिश्रणाच्या उद्दिष्टापासून काही अब्ज लिटर दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

FCI ने तुटलेल्या तांदळाचा पुरवठा थांबवल्याने धान्यावर आधारित डिस्टिलरीजच्या कामकाजावर काय परिणाम झाला?

22 जुलै 2023 रोजी डिस्टिलरीजना FCI ने अतिरिक्त तांदूळ/धान्याचा (SFG)  पुरवठा अचानक थांबवल्यामुळे बहुतेक धान्य आधारित डिस्टिलरीजपैकी काही तत्काळ तर काही उशिरा बंद झाल्या. दुर्दैवाने यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वासही डळमळीत झाला आहे. FCI ने अतिरिक्त तांदूळ पुरवठ्यासाठी दिलेले पेमेंट देखील परत केले आणि प्रत्यक्षात जारी केलेले डिलिव्हरी/रिलीझ ऑर्डर देखील रद्द केल्याने खळबळ उडाली.

कुठल्याही उद्योगातील गुंतवणुकीसाठी स्थिर आणि पारदर्शक धोरणे आवश्यक असतात आणि FCI ने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण इथेनॉल उद्योगाला धक्का बसला आहे. बँका/कर्जदारांनी इथेनॉल प्रकल्पांसाठी कर्ज नाकारणे किंवा त्याबाबतचा निर्णय पुढे ढकलणे सुरू केले आहे. त्यामुळे भारतात इथेनॉल उत्पादनामध्ये गुंतवणुकीचा उत्साह काहीसा कमी होताना दिसत आहे.

तुटलेल्या तांदळाच्या किमती सध्या खुल्या बाजारात जास्त आहेत आणि इथेनॉल उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी डिस्टिलरीज तेथून ते विकत घेण्याचा विचार करत आहेत का?

डिस्टिलरी गेटला पुरवल्या जाणार्‍या तुटलेल्या तांदळाची सध्याची किंमत सुमारे 23,000-24,000 रुपये प्रति टन आहे. ही किमत तुटलेले तांदूळ विकत घेणाऱ्या राईस मिलर्सपासून त्यांच्या अंतरावर अवलंबून आहे. FCI कडून खरेदी केलेला SFG तांदळामध्ये कोणतीही धूळ किंवा ओलावा नसतो आणि डिस्टिलरीला प्रत्येक टन SFG मधून साधारणपणे 450 लिटर इथेनॉल मिळते. दुसरीकडे, तुटलेल्या तांदळात भूश्यासह आणि ओलावा असतो. तुटलेल्या तांदळात स्टार्चचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे डिस्टिलरींना सुमारे 440 लिटर किंवा त्याहूनही कमी इथेनॉल मिळते.  त्यामुळे डिस्टिलरींना SFG च्या जागी तुटलेला तांदूळ वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

तथापि, ओएमसीने 7 ऑगस्टपासून तुटलेल्या तांदळापासून मिळणाऱ्या इथेनॉलची किंमत 4.75 रुपयांनी वाढवत  60.29 रुपये प्रति लिटर केली आहे. SFG च्या तुलनेत FCI कडून तुटलेल्या तांदळाची जास्त किंमत आणि कमी उत्पन्न भरून काढण्यासाठी हा उपाय पुरेसा नाही, असे अनेक डिस्टिलरीजना अजूनही वाटते. तथापि, कमी व्याजाचा बोजा आणि वाहतूक खर्च असलेल्या काही डिस्टिलरीज तोट्यात गेल्या आहेत. तथापि, तुटलेल्या तांदळाच्या किमती सध्याच्या पातळीवर राहिल्यास इथेनॉलच्या सध्याच्या 60.29 रुपये प्रतिलिटरच्या किमतीत आणखी वाढ करावी लागेल, जेणेकरून इथेनॉल उत्पादनाला तुटलेल्या तांदळाच्या वापरास प्रोत्साहन मिळेल.

मर्यादित पुरवठ्याच्या परिस्थितीत डिस्टिलरी त्यांच्या कामकाजातील सातत्यासाठी कोणत्या धोरणात्मक योजनांवर काम करत आहेत?

सरकार इथेनॉलसाठी मक्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देऊ इच्छित आहे आणि देशात मक्याचे उत्पादन वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णयही घेतले जात आहेत. त्यामुळे आम्हाला असेही वाटते की, भारतात मक्याची उत्पादकता वाढवण्याची प्रचंड क्षमता आहे, जी सध्याच्या ३.४ टन/हेक्टर वरून ४.६-४.७ टन (अजूनही ६ टन/हेक्टरच्या जागतिक सरासरीपेक्षा कमी) वाढवल्यास अतिरिक्त 12- 13 मिलियन टन मका मिळेल. हा मका 20% मिश्रणासाठी धान्य-आधारित डिस्टिलरीजमधून इथेनॉल पुरवठ्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेसे असेल.

ओएमसीने मका आधारित इथेनॉलची किंमत 7 ऑगस्टपासून 6.01 रुपयांनी 62.36 रुपये प्रति लिटर केली आहे. परंतु मक्यामधील स्टार्च सामग्रीची अनिश्चितता आणि सध्या उपलब्ध असलेल्या मक्याच्या गुणवत्तेमुळे बहुतांश धान्य आधारित डिस्टिलरींना समाधानकारकपणे काम कारणे चालवणे सोपे नाही. अनेक डिस्टिलरीज 58% पेक्षा कमी स्टार्च प्रमाणामुळे इथेनॉल रिकव्हरी सुमारे 365-370 लिटर इतकीच मिळते. इतके कमी इथेनॉल उत्पादन डिस्टिलरींना परवडणारे नाही. आमचा विश्वास आहे की, मका दीर्घकाळासाठी धान्य-आधारित डिस्टिलरीजसाठी सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे आणि सर्वात सहज उपलब्ध फीडस्टॉक असेल.

आत्तापर्यंत, डिस्टिलरीजचे कामकाज सुरळीत आणि अखंडपणे चालावे यासाठी सरकारकडून कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे?

वर नमूद केल्याप्रमाणे, 2025 मध्ये 10.2 अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्यास सक्षम होण्यासाठी इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची गरज आहे. त्यामुळे इथेनॉलसाठी स्थिर आणि पारदर्शक धोरणे ही सरकारकडून पहिली आणि प्रमुख अपेक्षा आहे. इथेनॉल उत्पादनासाठी SFG चा सर्व पुरवठा अचानक थांबवण्याचा FCI ने नुकताच घेतलेल्या निर्णयाची पुनरावृत्ती होऊ देऊ नये. दुसरे, जोपर्यंत आपण देशात सुमारे 48-50 दशलक्ष टन मक्याचे वार्षिक उत्पादन करू शकत नाही, तोपर्यंत FCI अतिरिक्त तांदळाचा पुरवठा चालू ठेवला पाहिजे आणि सातत्याने उपलब्ध करून दिला पाहिजे.  तिसरे, हवामान किंवा जागतिक किमती यांसारख्या विविध घटकांवर अवलंबून कृषी-उत्पादनाच्या बाजारातील किमती अस्थिर होण्याची शक्यता असते, अशावेळी सरकारने इथेनॉलच्या किमतीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. शेवटी, 7 ऑगस्टपासून निश्चित केलेल्या/सुधारित केलेल्या विद्यमान इथेनॉलच्या किमतींचा भारत सरकारच्या संयुक्त सचिवांच्या स्वतंत्र तज्ञ समितीने लवकरात लवकर आढावा घेतला पाहिजे.

इथेनॉलच्या किमती वाढवण्याच्या सध्याच्या मागणीनुसार, कोणती किंमत श्रेणी उद्योगाच्या हितासाठी अनुकूल मानली जाईल?

अतिरिक्त एफसीआय तांदळापासून (20,000 रुपये प्रति टन अधिक वाहतूक खर्च 500 रुपये प्रति टन) उत्पादित इथेनॉलची किंमत 58.50 रुपये प्रति लीटर दराने आणि एफसीआय तांदळापासून प्रति टन 450 लिटर इथेनॉल रिकव्हरी लक्षात घेता,  इथेनॉलची किंमत प्रति लीटर 45.56 रुपये होते.  मका आणि तुटलेल्या तांदळापासून उत्पादित इथेनॉलची किंमत खालीलप्रमाणे असेल:

अ) मक्याची किंमत 22,000 रुपये प्रति टन आहे आणि इथेनॉल रिकव्हरी 380 लीटर आहे. त्यामुळे प्रति लिटर इथेनॉलची किंमत 57.89 रुपये प्रति लीटर आहे (FCI तांदळाच्या तुलनेत 12.33 रुपये प्रति लिटर जास्त). एक साधे गणित असे दर्शविते की, मका-आधारित इथेनॉलची किंमत नंतर सुमारे 70.83 रुपये प्रति लिटर असावी, परंतु डिस्टिलरींना मक्यापासून अधिक डीडीजीएस मिळतात, हे लक्षात घेता तांदळाच्या डीडीजीएसपेक्षा कमी किमतीत विकले जात असले तरी, मक्यापासून उत्पादित इथेनॉलची किंमत 69-70 रुपये प्रति लिटर ठेवली जाऊ शकते.

b)तुटलेल्या तांदळाची किंमत 23,000 रुपये प्रति टन आहे आणि इथेनॉल रिकव्हरी 440 लीटर आहे,तर इथेनॉलची प्रति लिटर किंमत 52.27 रुपये आहे (FCI तांदळाच्या तुलनेत 6.71 रुपये प्रति लिटर जास्त). एक साधे गणित दाखवते की तुटलेली तांदूळ आधारित इथेनॉलची किंमत सुमारे 65.21 रुपये प्रति लिटर असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here