वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या संस्था उभारणीला ग्रीन सिग्नल

गुरुदासपूर (पंजाब) : पंजाब सरकारने राज्याची ऊस संशोधन आणि प्रशिक्षण संस्था उभारण्याच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला आहे. कलनौर येथील पंचायतीच्या रिकाम्या १०० एकर जागेवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर ही संस्था उभारण्यात येणार आहे. राज्यातील पठाणकोट, भोए, दिनानगर, गुरुदासपूर, कलनौर, धरिवाल, बाटला या ऊस पट्ट्याला या संस्थेचा फायदा होणार आहे.

या संदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नशेच्या आहारी जात असलेल्या तरुणांच्या हाताला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या काम देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील १२०० एकर जमीन ही दुर्लक्षित होती. आता त्याचा उपयोग करून घेण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने घेतला असून, त्यातील १०० एकरात ऊस संशोधन संस्था उभारली जाणार आहे.

कलनौर हे गाव देरा बाबा नानक विधानसभा मतदारसंघात येते. राज्याचे सहकारमंत्री सुखजिंदरसिंग रंधवा हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या संदर्भात कलनौर पंचायतीने यापूर्वीच पंचायतीच्या जागेवर ऊस संशोधन संस्था उभारण्यासाठी सर्वमताने अनुमती दिली आहे. त्यानंतर गेल्या डिसेंबर महिन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या एका टीमने त्या जागेला भेट दिली होती. त्यावेळी रांधवादेखील उपस्थित होते.

सहकारमंत्री रांधवा यांनी चार सदस्यांची एक समिती स्थापन केली असून, प्रकल्पासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा ही समिती घेणार आहे. येत्या पंधरा दिवसांत एक अहवाल सादर करण्याचे आदेश या समितीला दिले आहेत. या संस्थेच्या उभारणीला लागणारी ५० टक्के रक्कम पंजाब सरकार देणार असून, १६ टक्के रक्कम सहकारी तर उर्वरीत रक्कम राज्यातील खासगी साखर कारखाने देणार आहेत.

या संदर्भात सहकारमंत्री रांधवा म्हणाले, आमचे सुरुवातीचे लक्ष ऊसाचे क्षेत्र वाढवण्याकडे असणार आहे. सध्याच्या घडिला राज्यात प्रति एकर ३२५ ते ३५० क्विंटल ऊस उत्पादन घेतले जाते. ही सरासरी ४०० क्विंटलपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न असेल. जर ५० क्विंटलचा फरक पडू लागला तर, शेतकऱ्यांना प्रति एकर १५ हजार रुपये जादा मिळू लागतील.

शुगरफेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक दविंदर सिंग म्हणाले, उत्तर प्रदेशात प्रति एकर ३६५ ते ३७० क्विंटल ऊस उत्पादन होते. पंजाबमध्येही असे उत्पादन घेण्याची क्षमता आहे. जेंव्हा प्रति एकर उत्पादन वाढेल तेव्हा निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांचे जीवनमान सुधारेल. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखान्यातील कामगार यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here