हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा
कवर्धा (छत्तीसगड) : चीनी मंडी
उसाची एफआरपीची बिले यंदा मोठ्या प्रमाणावर थकली असली तरी, ऊस नगदी पिक आहे हे कोणीच नाकारणार नाही. गेल्या काही वर्षांत जादा पैसे मिळवण्याच्या मोहातून शेतकऱ्यांनी उसावरच भर दिला आहे. पण, यामुळे भूजलपातळी मोठ्या प्रमाणावर घटत असल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.
सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांमध्ये भात आणि उसाचा समावेश होता. पण, भातापेक्षा ऊस शेती ही भविष्यात हानीकारक ठरण्याची भीती आहे. कारण, उसाची शेती हे केवळ ४० टक्के पावसाच्या पाण्यावर आहे. उर्वरीत ६० टक्के पाणी हे बोअरवेलच्या साह्याने द्यावे लागते. त्यामुळे ऊस शेती होणाऱ्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भूजल पातळी खालवत असल्याचे दिसत आहे.
कवर्धा जिल्ह्यात यंदा ५५ हजार हेक्टर क्षेत्रात ऊस होण्याची शक्यता आहे. मेहनत कमी आणि पैसे भरपूर यामुळे शेतकरी उसालाच प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात आणखी एक साखर कारखाना सुरू होणार असल्याने पुढील वर्षापासून तेथेही गाळप होणार आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र आणखी वाढून भूजल पातळी खाली जाण्याची भीती आहे. यामुळे ऊसच काय इतर पिकांसाठीही पाणी मिळणे अशक्य होणार आहे. पंडरिया क्षेत्रात पाण्यासाठी हाहाकार माजण्याची भीती आहे.
पाणी ही जीवनावश्यक बाब आहे. पाण्याला बेपर्वाईने वापर करणे धोक्याचे आहे. त्यामुळे ऊस शेती सलग न करता किमान एक वर्षाच्या कालखंडानंतर करावी, त्या काळात पाणी कमी लागणारी इतर पिके घ्यावीत, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
सध्या उसाच्या एकाच जातीची लागवड होताना दिसते. मुळात एक थेंब उसाचा रस तयार होण्यासाठी सरासरी ८० थेंब पाणी लागते. त्यामुळे कमी पाणी लागणाऱ्या उसाच्या जाती शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न होण्याची गरज आहे.
इतर पिकांमधूनही चांगले पैसे मिळवणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यासाठी ऊसच नव्हे तर, हळद इतर धान्यांची शेती करणेही सोयीस्कर ठरू शकते. त्यासाठीही फारशी मेहनत लागत नाही आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp