नवी दिल्ली : जुलै २०२२ मध्ये जीएसटी कलेक्शन १,४८,९९५ कोटी रुपये झाले आहे. आतापर्यंतचे हे दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी कलेक्शन आहे. जून महिन्यात १,४४,६१६ कोटींची जीएसटी वसुली झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये १,६७,५४० कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले होते. त्यानंतर जुलैमध्ये सर्वाधिक कलेक्शन दिसून आले आहे. गेल्या वर्षी जुलै २०२१ च्या तुलनेत जुलै २०२२ मध्ये जीएसटी वसुलीत २८ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात १,१६,३९३ कोटी रुपये जीएसटी कलेक्शन झाले होते.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जुलै २०२२ मध्ये १,४८,९९५ कोटी रुपयांच्या जीएसटी कलेक्शनमध्ये सीजीएसटी २५,७५१ कोटी रुपे, तर एसजीएसटी वसुली ३२,८०७ कोटी रुपये झाली आहे. आयजीएसटीच्या ७९,६१८ कोटी रुपयांच्या कलेक्शनमध्ये ४१,४२० कोटी रुपयांची वसुली इम्पोर्टमधून झाली आहे. तर सेस कलेक्शन १०,९२० कोटी रुपयांचे आहे. एक जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतरची ही द्वितीय क्रमांकाची उच्चांकी आकडेवारी आहे. तर सलग पाचव्या महिन्यात जीएसटी कलेक्शन १.४ लाख कोटींवर आहे.