कोल्हापूर : साखरेला ४० रुपये प्रतिकिलो हमीभाव मिळावा. केंद्र सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष देवून धोरण ठरवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी केले. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या हंगाम समाप्ती प्रित्यर्थ संचालक राऊ पाटील व त्यांच्या पत्नीच्या हस्ते सत्यनारायण महापूजा झाली. यावेळी कारखान्याने संपलेल्या हंगामात ६ लाख ९७ हजार ६८२ टन ऊस गाळप करून ८ लाख ९७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, अशी माहिती नरके यांनी दिली.
अध्यक्ष नरके म्हणाले की, यंदा सरासरी साखर उतारा १२.८३ टक्के मिळाला आहे. कारखान्याने उसाला ३२०० रुपयांप्रमाणे संपूर्ण बिल आदा केले. संपलेल्या हंगामात सरासरी ६९ टन हेक्टरी उत्पादकता मिळाली आहे. सहवीज प्रकल्पातून तीन कोटी ४१ लाख २१ हजार युनिट वीजनिर्मिती केली असून, ती निर्यातही केली. शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी २२३ कोटी २५ लाख ८५ हजार ६२४ रुपये रक्कम आदा केली आहे. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास पाटील, सर्व संचालक, कार्यक संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.